कॅन्सरग्रस्तांना हवी मानसिक आधाराची साथ, चिकाटीनेच करता येईल आजारावर मात; अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 04:27 PM2021-02-04T16:27:45+5:302021-02-04T16:46:57+5:30

Cancer Patients : कर्करोग झाला म्हणून घाबरून न जाता या आजाराचा मुकाबला करणे गरजेचं आहे. कारण धीराने या आजाराशी लढल्यास कर्करोगातून सुखरूप बाहेर पडू शकतो.

Cancer patients need mental support ... | कॅन्सरग्रस्तांना हवी मानसिक आधाराची साथ, चिकाटीनेच करता येईल आजारावर मात; अशी घ्या काळजी

कॅन्सरग्रस्तांना हवी मानसिक आधाराची साथ, चिकाटीनेच करता येईल आजारावर मात; अशी घ्या काळजी

googlenewsNext

कर्करोग हा शब्द जरी ऐकला तरी काही क्षणासाठी मनात एकच भीती दाटून येते. कर्करोगाचे निदान झाल्यास रूग्णाला पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. हा अतिशय घातक आजार असून हा रूग्णाच्या केवळ शारीरिकच नव्हेतर मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो. कारण कर्करोगावरील उपचार खूप वेदनादायी, खर्चिक आणि वर्षानुवर्षे चालणारे असतात. या उपचाराचा काळावधीत रूग्णाच्या शरीरावरच नव्हेतर मनावरही अनेक घातक होतात. बरेच रूग्ण चिंता व नैराश्याच्या गर्तेत अडकलेले दिसून येतात. या आजारपणामुळे कंटाळलेल्या या रूग्णांना मानसिक आधार देणं खूप गरजेचं आहे. कर्करूग्णांना लढण्याचे बळ दिल्यास कर्करोगावर ते सहज मात करू शकतील.

कर्करोगाचा परिणाम केवळ एखाद्याच्या शरीरावर होत नाही तर मनावरही होतो, हे एक सत्य आहे. कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना भावनिक आव्हानांना सामोरे जावे लागते. कर्करोगाचे निदान झाल्यास रूग्णाचे संपूर्णच बदलून जाते. कुटुंबात एकच चिंतेचे वातावरण पाहायला मिळते. कर्करोगावरील वेदनादायी उपचारात किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीमुळे रूग्णाला अशक्तपणा येतो. या औषधोपचारांमुळे अनेक रूग्णांना एकाकीपणा जाणवत असल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो. परंतु, कर्करोग झाला म्हणून घाबरून न जाता या आजाराचा मुकाबला करणे गरजेचं आहे. कारण धीराने या आजाराशी लढल्यास कर्करोगातून सुखरूप बाहेर पडू शकतो. याकरता कर्करोगावरील उपचार सुरू असताना रूग्णांनी स्वतः मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

1.       मानसिक ताणतणाव, चिंता किंवा नैराश्य येऊ नये, यासाठी तुम्ही स्वतःचे मन कुठल्यातरी कामात गुंतवण्याचा प्रयत्न करा. यासाठी दैनंदिन वेळापत्रक तयार करा.
 
2.       दिवसभराच्या कामातून काही वेळ स्वतःसाठी काढा आणि स्वतःच्या मनाशी बोलण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपल्या शरीरात कोणते बदल असामान्य बदल होतात का हे लक्षात घेऊन त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.


 
3.       आपल्याला कशाची चिंता वाटते, कशामुळे तुम्हाला आनंद होतो, कोणत्या गोष्टीमुळे तुमचा तणाव वाढतो यासंबंधी गोष्टी एका वहीत लिहून ठेवा. सकारात्मक विचार लिहा आणि यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळेल.
 
4.       जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहा. तुम्हाला कर्करोग असल्याचं निदान झाल्यास हार मानू नका. हिंमतीने या समस्येला सामोरे जा. यामुळे कर्करोगाशी लढण्याचे बळ मिळेल.
 
5.       नैराश्य व चिंता कमी करण्यासाठी नियमित ध्यान व योगासने करा. याशिवाय दररोज चालणे किंवा एरोबिक्स करणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
 
6.       तणाव कमी व्हावा, यासाठी वाचन,  संगीत ऐकणे, शैक्षणिक कार्यक्रम पाहणे, चित्रकला किंवा बागकाम करणे निवडू शकता. आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
 
7.       मनातील गोष्टी कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळेपणे बोला, यामुळे मानसिक ताण कमी होऊ शकतो.
 
8.       संतुलित आणि निरोगी आहाराचे सेवन करा. ताजी फळे आणि भाज्या खा. मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. मद्यपान आणि धूम्रपान करू नका.
 
9.       वेळोवेळी मानसिक आरोग्याची तपासणी कर्करोगाच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. नैराश्य व चिंतेत असणाऱ्या रूग्णांचे समुपदेशन केल्यास ते निरोगी आरोग्य जगू शकतात.


10.   कर्करोगावर यशस्वीरित्या मात केलेल्या रुग्णांशी बोलू शकता, कर्करोगाचा सामना करणाऱ्या रूग्णांविषयी वाचू शकता जे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल.

- डॉ. शिवांगी पवार, सल्लागार मनोचिकित्सक

Web Title: Cancer patients need mental support ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.