कॅन्सरच्या ट्रिटमेंटमुळे रात्रीची दृष्टी अधिक तीक्ष्ण, विचित्र परिणाम पाहुन डॉक्टरही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:14 PM2021-12-21T17:14:23+5:302021-12-21T17:17:31+5:30

कॅन्सरवरील उपचारांचे काही दुष्परिणामही होतात (Cancer treatment side effects). अशाच एका उपचाराचा असा परिणाम दिसून आला आहे, जो पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत.

cancer treatment improved eyesight or eye vision at night in cancer patient | कॅन्सरच्या ट्रिटमेंटमुळे रात्रीची दृष्टी अधिक तीक्ष्ण, विचित्र परिणाम पाहुन डॉक्टरही हैराण

कॅन्सरच्या ट्रिटमेंटमुळे रात्रीची दृष्टी अधिक तीक्ष्ण, विचित्र परिणाम पाहुन डॉक्टरही हैराण

Next

कॅन्सर (Cancer) हा अतिशय गंभीर, जीवघेणा आजार मानला जातो. आजही असे अनेक प्रकारचे कॅन्सर (Type of cancer) आहेत, जे पूर्ण बरे होत नाहीत किंवा त्यांच्यावरच्या उपचारांना (Cancer treatment) मर्यादा आहेत. कॅन्सरवर वेगवेगळ्या प्रकारांनी उपचार केले जातात. केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया या कॅन्सरवर उपचार करण्याच्या सर्वमान्य पद्धती आहेत. कॅन्सरवरील या उपचारांचे काही दुष्परिणामही होतात (Cancer treatment side effects). अशाच एका उपचाराचा असा परिणाम दिसून आला आहे, जो पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत.

प्रकाशकिरणांच्या साह्याने केल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीला फोटोडायनामिक थेरपी (Photodynamic Therapy) म्हणतात. यामध्ये तीव्र किरणांच्या साह्याने कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट केल्या जातात. गेली अनेक वर्षं ही उपचारपद्धती वापरली जात आहे. अलीकडेच या उपचारपद्धतीचा वापर करण्यात आलेल्या काही व्यक्तींवर एक विचित्र परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. या व्यक्तींमध्ये रात्री म्हणजेच अंधारात चांगलं पाहता येण्याची क्षमता विकसित झाली आहे. म्हणजेच त्यांची दृष्टी अधिक चांगली झाली असून, विशेषत: रात्रीची दृष्टी (Night Vision) खूप तीव्र झाली आहे. या परिणामामुळे शास्त्रज्ञ आणि डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. आज तकच्या रिपोर्टनुसार जर्नल ऑफ फिजिकल केमिस्ट्री लेटर्समध्ये याबाबतचा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे.

गेल्या वर्षी, संशोधकांना असं आढळून आलं, की आपल्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये ऱ्होडॉप्सिन (Rhodopsin) नावाचं उजेडाप्रति संवेदनशील असलेलं एक प्रकारचं प्रोटीन आहे. डोळ्यांवर प्रकाश पडताच क्लोरिन E6 या प्रकाशसंवेदनशील पदार्थाशी त्याचा संपर्क येतो आणि ही क्रिया घडते. क्लोरिन E6 हा कॅन्सरच्या उपचारांसाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. शास्त्रज्ञांना हे माहीत आहे, की डोळ्यांच्या आत असलेल्या रेटिनल (Retinal) या जैविक घटकावर प्रकाशामुळे काहीही परिणाम होत नाही. दिसण्यासाठी योग्य उजेड रेटिनल आणि ऱ्होडॉप्सिन यांना वेगवेगळं करतो. तो या दोन्हींचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर करतो. त्यामुळे आपला मेंदू आपण काय पाहतोय, काय पाहतो हे ठरवू शकतो. रात्री आपल्या डोळ्यांना तेवढा प्रकाश मिळत नाही.

फ्रान्समधल्या लॉरेन विद्यापीठाचे रसायनतज्ज्ञ अँटोनियो मोनारी यांनी सांगितलं, की शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे, की रात्रीच्या वेळी इन्फ्रारेड प्रकाशात क्लोरिन E6 डोळ्यात टोचलं, तर दिसण्यासाठी योग्य उजेडात रेटिनामध्ये जे बदल होतात तेच बदल या वेळी होतात. याचाच अर्थ असा, की काही विशेष प्रक्रिया नसेल तर रात्री एखादी गोष्ट पाहण्यासाठी डोळ्यांवर ताण द्यावा लागतो. ऱ्होडॉप्सिन रेटिनाशी कसा समन्वय साधतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही; मात्र फोटोडायनामिक थेरपीने उपचार केलेल्या कॅन्सर रुग्णांमध्ये, रात्रीच्या वेळीदेखील ही प्रक्रिया वेगवान होते. यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांची रात्रीची दृष्टी खूप चांगली आणि अधिक शक्तिशाली झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

याची चाचणी घेण्यासाठी प्रयोगशाळेत काही चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्याबाबत माहिती देताना अँटोनियो मोनारी म्हणाल्या, याकरिता आम्ही लॅबमध्ये मॉलिक्युलर सिम्युलेशन मॉडेल बनवलं. त्यात प्रत्येक रसायनाच्या प्रत्येक अणूची हालचाल मोजण्यात आली. कोण कोणत्या दिशेने खेचतं आणि कोण दूर जातं ते शोधलं. तसंच रासायनिक बंध कोण बनवतात आणि कोण जुने बंध तोडतात, हेही पाहण्यात आलं. अनेक महिने हा अभ्यास करण्यात आला. त्यातून लाखो समीकरणं मांडली गेली. त्यानंतर फोटोडायनामिक थेरपी घेत असलेल्या व्यक्तींच्या डोळ्यांमध्ये इन्फ्रारेड रेडिएशनमुळे रासायनिक बदल झाले. त्यामुळे त्यांची रात्रीची दृष्टी सुधारली हे सिद्ध झालं आहे. लिपिड मेम्ब्रेनमध्ये ऱ्होडॉप्सिन टाकून त्यावर क्लोरिन E6 आणि पाणी टाकण्यात आलं. त्या वेळी क्लोरिन E6ने इन्फ्रारेड रेडिएशन शोषून घेतलं आणि डोळ्यांच्या ऊतींमध्ये असलेल्या ऑक्सिजनसह त्यांची प्रक्रिया झाली. यामुळे उच्च क्षमतेचा सक्रिय सिग्लेंट ऑक्सिजन तयार झाला. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी मारल्या गेल्या आणि हा ऑक्सिजन रेटिनाला मिळून डोळ्यांची ताकद वाढली. यामुळे त्या व्यक्तींना रात्रीच्या दृष्टीची उत्तम क्षमता प्राप्त झाली.

आता शास्त्रज्ञांना ही संपूर्ण रासायनिक क्रिया ज्ञात झाली आहे. त्यामुळे फोटोडायनामिक थेरपीने उपचार घेतलेल्या व्यक्तींना अशा विचित्र दुष्परिणामांना सामोरं जावं लागणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न आता शास्त्रज्ञ करत आहेत; मात्र या प्रक्रियेचं ज्ञान झाल्यामुळे भविष्यात डोळ्यांशी संबंधित समस्यांवरही मात करता येईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Web Title: cancer treatment improved eyesight or eye vision at night in cancer patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.