बाळंतपणानंतर वजन वाढलंय? 'या' सहा गोष्टी नक्की ठरतील फायद्याच्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 12:59 PM2018-02-20T12:59:52+5:302018-02-20T13:00:50+5:30
बाळंतपणानंतरचं वजन कसं घटवायचं? हा मोठा प्रश्न बाळंतीण महिलेला पडला असतो.
मुंबई- वजन कमी करणं व आहे ते वजन आटोक्यात ठेवणं हा सगळ्यांसाठीच मोठा टास्क असतो. नियमित व्यायाम व खाण्यापिण्याच्या योग्य सवयीमुळे वजन घटत असलं तरी अनेकांकडून वजन कमी होत नसल्याच्या तक्रारीही आहेत. विशेष म्हणजे बाळंतपणानंतरचं वजन कसं घटवायचं? हा मोठा प्रश्न बाळंतीण महिलेला पडला असतो. काही बाळंतीण महिलांचं वजन लगेच घटतं तर काहींना बरिच मेहनत करावी लागते. तुम्हाला जर गरोदरपणातील वजन घटवायचं असेल तर या सोप्या गोष्टी नक्की करून पाहा.
योग्य व संतुलित आहार घ्या-
तुमच्या दैनंदिनीमध्ये केलेले काही छोटे बदल बाळंतपणानंतरच वजन घटविण्यासाठी फायद्याचे ठरतता. त्यासाठी कठीण डाएट प्लॅन किंवा जीममध्ये कठोर मेहनतीची गरज नाही, असं अनेकदा अभ्यासातून समोर आलं आहे. बाळंतपणात वाढलेलं वजन घटविण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य व संतुलित आहार घेणं. दिवसातून पाच वेळा योग्य प्रमाणात फळ व भाज्या खा. तुमची नुकतीचं डिलिव्हरी झाली असल्याने तुमच्या शरीराची झिज भरून काढण्यासाठी पोषक पदार्थांची आवश्यकता असते, शरीराला कॅलेरीज आवश्यक असतात. यासाठी फळ व भाज्या खाणं फायद्याचं ठरेल.
जास्त साखर, फॅट्स, मीठ आणि कॅलेरीज असलेले पदार्थ खाऊ नका. संतुलित आहार वजन घटवायला नक्की मदत करतो.
फायबर जास्त असलेले पदार्थ खा
हाय फायबर असलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी मदत करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नक्की फायदा होतो. ओट्स, सोयाबीन, डाळ, धान्य आणि बियाणांचा जास्त समावेश आहारात करा.
योग्य प्रोटीनचा समावेश
आहारात प्रोटीनचा योग्य समावेश असल्यास तुमचं मेटाबॉलिज्म चांगलं होतं. मेटाबॉलिज्म रेट योग्य असल्यास वजन घटणं लवकर शक्य होतं. यासाठी आहारात अंडी, मांस, मासे, शेंगदाणे, काजू यांचा समावेश करा.
भरपूर पाणी प्या
बाळंतीण महिलेच्या शरीरासाठी पाणी अत्यंत उपयुक्त आहे. बाळाला दूध पाजत असल्याने आईच्या शरीराचं तापमान व पचनशक्ती योग्य ठेवण्याचं काम पाणी करतं. त्यामुळे भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. दिवासाला एक लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने वर्षाला दोन किलो वजन कमी होतं, असं अनेक अभ्यासातून सिद्ध झालं आहे. पाण्यामुळे मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. पाणी जास्त प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे कमी खाल्लं जातं.
व्यायाम करा
योग्य आहाराबरोबर व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे. एका ठिकाणी फार वेळ बसल्याने शरीरातील चरबी वाढते. व्यायाम केल्याने शरीराची प्रक्रिया योग्य होऊन मधुमेह, कर्करोग यांसारख्या आजारांची बाधा होत नाही. व्यायाम करणं म्हणजे जीमला जाणं. ही व्याख्या पूर्णपणे चुकीची आहे. व्यायाम करण्यासाठी जीमला जाण्याची गरज नाही. चालणं हा उत्तम व्यायाम असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन मस्त चालून आलात तरी ते पुरेसं आहे. त्याचबरोबर योगाही करता येईल.
पुरेशी झोपं घ्या
पुरेशी झोप न होणं वजनावर वाईट परिणाम करतं. वरील सर्व बाबींचं जरी पालन केलं तर पुरेशी झोप न घेतल्यास त्याचा योग्य परिणाम होणार नाही. जर तुम्हाला आठ तास झोप घेणं शक्य नसेल तर जितकी झोप घेता येईल तितकी नक्की घ्या. रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. योग्य झोप झाल्यास दिवसही छान जातो व आहारा-व्यायाम याचा योग्य मेळ साधता येतो.
नोट- वरील संपूर्ण माहिती तुमच्या माहितीसाठी आहे. तुम्हाला जर वजन घटवायचं असेल तर वरील गोष्टी करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.