झोप येत नाही, निराश वाटतेय? या टोल ‘फ्री’वर करा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 06:15 PM2022-11-26T18:15:09+5:302022-11-26T18:20:02+5:30
या टेलिमानसिक सेवांमध्ये समुपदेशन, तज्ज्ञांचा सल्ला आणि ई-प्रिस्क्रिप्शन प्रदान करण्यात येते...
पिंपरी : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग ॲक्रॉस स्टेट्स (टेलिमानस) उपक्रमाची सेवा सुरू केली आहे. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच प्रत्येक रुग्णापर्यंत आवश्यक ती सेवा पोहोचवणे हे टेलिमानसिक आरोग्य सेवेमागचे उद्दिष्ट आहे. या टेलिमानसिक सेवांमध्ये समुपदेशन, तज्ज्ञांचा सल्ला आणि ई-प्रिस्क्रिप्शन प्रदान करण्यात येते.
टेलिमानस या सेवेचा तुम्हाला घरबसल्या उपभोग घ्यायचा असल्यास हेल्पलाइन नंबर १४४१६ आणि १-८००-९१-४४१६ वर फोन करून तुम्ही सविस्तर महिती मिळवू शकता. सुरुवातीला फोनवर तुमच्याबाबत प्राथमिक माहिती घेतली जाईल. त्यानंतर त्यांच्या क्षेत्रातील प्रशिक्षित समुपदेशकाकडे तुमचा फोन हस्तांतरित केला जाईल. आवश्यक असल्यास, तुमचा फोन क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार, सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका व आरोग्यतज्ज्ञ यांच्याकडे ऑनलाइन माध्यमातून जोडण्यात येईल. त्यावर तुमच्या समस्यांवर उपाय सांगितले जातात. तसेच उपचारांबाबतही मार्गदर्शन केले जाते.
फोनवर संवाद साधल्यानंतर रुग्णाची स्थिती बघता वैयक्तिक सेवांची आवश्यकता असल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवले जाते. देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत परवडणारी मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
१४४१६ वर साधा संपर्क
आरोग्याविषयी तक्रार असल्यास १४४१६ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. त्यावर आरोग्याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. तसेच उपचाराबाबतही सांगितले जाते.
काय आहे टेलिमेडिसिन
केंद्र सरकारच्यावतीने नागरिकांसाठी मोफत फोन करून त्यांच्या आरोग्याविषयीच्या समस्या मांडण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या ठिकाणी फोन करून नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी मांडता येतात.