झोप येईना? हा मंत्र म्हणा आणि निवांत झोपा, आयुर्वेद विद्यापीठाकडून अफूचे सेवन करणाऱ्यावर यशस्वी प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 06:16 AM2024-01-30T06:16:30+5:302024-01-30T06:16:46+5:30
Health News: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विद्यापीठाने धर्मग्रंथात सांगितलेल्या उपचार मंत्रांवर संशोधन सुरू केले आहे. त्यासाठी विद्यापीठात योगा थेरपी आणि मंत्र थेरपी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.
जोधपूर - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विद्यापीठाने धर्मग्रंथात सांगितलेल्या उपचार मंत्रांवर संशोधन सुरू केले आहे. त्यासाठी विद्यापीठात योगा थेरपी आणि मंत्र थेरपी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.
यामध्ये चार वेदांव्यतिरिक्त आयुर्वेद आणि चरक संहितेत नमूद केलेल्या वैद्यकीय मंत्रांवर संशोधन करून रोगाशी संबंधित एक प्रोटोकॉल तयार करण्यात येणार आहे.
व्यसनमुक्ती केंद्रात येणाऱ्या रुग्णावर रात्री सुक्तम मंत्राची पहिली यशस्वी चाचणी विद्यापीठाने केली. जोधपूरच्या बासनी येथील अनिल हा १५ वर्षांपासून अफूचे सेवन करत होता. अफू सोडल्यानंतर त्याला रात्रीची झोप येईना. त्याला केवळ दीड ते दोन तास झोप येत असे. विद्यापीठातील रुग्णालयात अनिलला कानात ईअर बड घालून रात्री सुक्तम मंत्र सांगण्यात आला, जो पाच मिनिटांचा आहे. त्यानंतर आठवडाभरातच अनिलला ५ ते ६ तासांची झोप येऊ लागली.
धर्मग्रंथात लिहिलेल्या मंत्रांवर वैद्यकीय संशोधनाचे काम सुरू आहे. योगसाधनेचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
-प्रा.पीके प्रजापती, कुलगुरू, आयुर्वेद विद्यापीठ जोधपूर
अनेक आजारांवर होणार उपचार
- बैठी जीवनशैली वाढल्यामुळे मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, कर्करोग आदी आजार सध्या वाढले आहेत.
- हे रोग बरे करण्यासाठी उपचार मंत्रांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णाला भविष्यात त्याच्यावर औषधे घेण्याची गरज भासणार नाही.
- चावण मंत्र, शावर मंत्र, गायत्री मंत्र, विष्णू सहस्त्रनाम आणि इतर मंत्रांवर विद्यापीठात संशोधन सुरू आहे.
- यामुळे राग आणि तणाव कमी होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होणार आहे.