CoronaVirus News: ...तर अवघ्या ३० सेकंदांत होणार कोरोनाचा खात्मा; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
By कुणाल गवाणकर | Published: November 17, 2020 06:59 PM2020-11-17T18:59:58+5:302020-11-17T19:00:04+5:30
CoronaVirus News: कार्डिफ विद्यापीठाचं महत्त्वपूर्ण संशोधन; कोरोना विरोधातील लढ्यात फायदेशीर ठरणार
वॉशिंग्टन: जगातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्यानं वाढते आहे. भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरीही अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. युरोपातल्या काही देशांनी पुन्हा लॉकडाऊन केला आहे. तर दररोज सव्वा ते दीड लाख रुग्ण आढळून येत असल्यानं अमेरिकेतील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.
कोरोनावरील काही लसी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसींचे परिणाम सकारात्मक दिसत आहेत. मात्र अद्याप या लसी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्यास बराच वेळ आहे. त्यामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्कचा वापरच मदतशीर ठरत आहे. त्यातच आता माऊथवॉशदेखील कोरोना विषाणू नष्ट करू शकत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. कार्डिफ विद्यापीठानं याबद्दलचं संशोधन केलं आहे.
काही माऊथवॉशमध्ये असलेले घटक कोरोना विषाणूशी लढू शकत असल्याचं विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. प्राध्यापक डेविड थॉमस यांनी विद्यापीठाच्या संशोधकांच्या टीमचं नेतृत्व केलं. cetypyridinium chloride (CPC) असलेले माऊथवॉश कोरोना विषाणूशी लढण्यास सक्षम असल्याची माहिती संशोधनातून प्राप्त झाली.
जवळपास १२ आठवडे संधोधकांनी माऊथवॉश कोरोना विषाणू नष्ट करण्यात किती प्रभावी ठरू शकतो, याबद्दलचं संशोधन केलं. याबद्दल अधिक संशोधन करण्यात येणार आहे. मात्र सध्या हाती लागलेल्या माहितीनुसार सीपीसीचा समावेश असलेले माऊथवॉश कोरोना विषाणूचा खात्मा करू शकतात. याविषयीची अंतिम चाचणी आता केली जाणार आहे. यासोबतच सर्वसामान्य माऊथवॉशदेखील कोरोना विषाणू विरोधात प्रभावी ठरू शकतात का, याबद्दलही संशोधन केलं जाणार आहे.