रोखीने व्यवहार करणारी हॉस्पिटल्स आयकरच्या रडारवर; पॅन नंबरची नोंदही नाही, करचुकवेगिरीचा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 06:19 AM2022-08-21T06:19:01+5:302022-08-21T06:19:14+5:30
विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेताना शक्य झाले नाही तरी उपचार सुरू झाल्यानंतर पॅन क्रमांक नोंदविणे शक्य आहे.
मुंबई :
राज्यातील अनेक शहरांमधील रुग्णालयांतून रोखीने व्यवहार होत असल्याची माहिती आयकर विभागाला प्राप्त झाली असून, आता विभागाने या रुग्णालयांचे व्यवहार तपासण्याचे नियोजन केले आहे. रोखीने व्यवहार करताना संबंधित रुग्णाचा किंवा पैसे भरणाऱ्याचा पॅन क्रमांक नोंदविला जात नसल्याचीही माहिती विभागाला मिळाली असून, त्या अनुषंगानेच कर चुकवेगिरीच्या मुद्द्यावर आता विभागाने कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत राज्यातील द्वितीय, तृतीय श्रेणी शहरे, नागरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोखीने व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाने तेथे छापेमारी करत कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली. या रकमेची कोणतीही व्यावहारिक नोंद या छाप्यादरम्यान विभागाला सापडली नाही. रोखीने झालेल्या या व्यवहारांमुळे कर चुकवला गेला असून, महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळेच आता या शहरांतील अन्य घटकांकडे विभागाने आपला मोर्चा वळवला आहे.
पार्टी हॉल आणि व्यावसायिकांकडे लक्ष
नागरी भागात अनेक ठिकाणी पार्टी हॉल, पार्टी लॉन्स आहेत. इथे होणाऱ्या समारंभांसाठी होणारे व्यवहारही रोखीने होत असल्याची माहिती विभागाकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. याखेरीज, वास्तूविशारद, डॉक्टर, वकील यांचेही व्यवहार तपासण्याची तयारी विभागाने सुरू केली आहे.
लाखो रुपयांचे व्यवहार
- मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा प्रमुख शहरांमध्ये विभागाची कार्यालये आहेत. जिल्हानिहाय देखील विभागाची कार्यालये आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रत्येक शहरातील व्यवहार तपासणे शक्य होत नाही.
- मात्र, लहान शहरांतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी रकमेमुळे आता तिथे लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
- रोखीने व्यवहार होतात, तिथे संबंधितांचा पॅन क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र, रुग्ण आपत्कालीन प्रसंगात येतात, उपचाराला प्राधान्य द्यावे लागल्याने पॅनकार्ड नोंदविणे शक्य होतेच असे नाही, असे रुग्णालयांचे सांगतात.