काय सांगता! मोतीबिंदुच्या ऑप्रेशनमुळे स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता कमीच, संशोधनच सांगते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 04:52 PM2022-01-26T16:52:24+5:302022-01-26T16:55:37+5:30
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्याने स्मृतिभ्रंशाचा (Dementia) धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा या संशोधनाच्या आधारे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (Washington University) संशोधकांनी केला आहे.
साधारण पन्नाशीनंतर डोळ्यांत (Eyes) मोतीबिंदू (Cataracts) होण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी तो काढून टाकण्याची शस्त्रक्रिया (Cataracts Surgery) केली जाते. दर वर्षी लाखो नागरिक ही शस्त्रक्रिया करून घेतात. आजकाल आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अगदी सहज सोपी झाली असून, काही तासांत रुग्ण घरी जाऊ शकतो.
डोळ्यांशी संबंधित या साध्याशा शस्त्रक्रियेचा संबंध मानवी स्मरणशक्तीशी (Memory) आहे असा शोध अलीकडेच अमेरिकेत (USA) झालेल्या एका संशोधनातून पुढे आला आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्याने स्मृतिभ्रंशाचा (Dementia) धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा या संशोधनाच्या आधारे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (Washington University) संशोधकांनी केला आहे. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
जामा इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा स्मरणशक्तीवर काय परिणाम होतो, याचं उत्तर शास्त्रज्ञांनी दिलं आहे. मोतीबिंदू आणि स्मृतिभ्रंश यांच्यातला संबंध समजून घेण्यासाठी या संशोधकांनी 3 हजार नागरिकांवर संशोधन केलं. यामध्ये सुमारे 65 वर्षं वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. यात सहभागी असलेल्या सुमारे 50 टक्के व्यक्तींनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर 8 वर्षं त्यांचं निरीक्षण करण्यात आलं. त्यात असं आढळलं, की डोळ्यांतला मोतीबिंदू काढून टाकल्यानंतर रुग्णांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका 29 टक्क्यांनी कमी झाला.
डोळ्यांतला मोतिबिंदूचा भाग काढून टाकल्यानंतर निळा प्रकाश (Blue Light) रुग्णापर्यंत अधिक पोहोचू लागतो. निळा प्रकाश रेटिनाच्या (Retina) पेशींना पुन्हा सक्रिय करतो, ज्याचा संबंध माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेशी असतो. झोप चांगली लागते. परिणामी, मानवी मेंदू (Brain) अधिक चांगलं कार्य करतो, असं या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे. संशोधक डॉ. सेसिलिया ली यांच्या मते, या संशोधनादरम्यान मिळालेले पुरावे आश्चर्यकारक आहेत.
कारण याआधी शरीराच्या दोन्ही भागांचा असा संबंध समजला नव्हता. या संशोधनाचे परिणामदेखील महत्त्वाचे आहेत. कारण जगातल्या बहुतेक देशांमध्ये मोतिबिंदूचे रुग्ण वाढत आहेत. एकट्या इंग्लंडमध्ये दर वर्षी मोतीबिंदूच्या 3 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याच वेळी, अमेरिकेत हा आकडा 20 लाख आहे. आजकाल बहुसंख्य वृद्धांमध्ये स्मरणशक्ती कमी होणं, निर्णय घेण्याची, विचार करण्याची क्षमता कमी होणं, बोलण्यात अस्पष्टता येणं अशी लक्षणं दिसतात. त्या पार्श्वभूमीवर हे संशोधन महत्त्वाचं आहे.
मोतीबिंदू हा वृद्धापकाळात होणारा डोळ्यांचा आजार आहे. वयाच्या पन्नाशीनंतर शरीरात अँटिऑक्सिडंट्सची (Antioxidents) कमतरता निर्माण होते आणि डोळ्यांमध्ये कॅल्शियम (Calcium) जमा होऊ लागते. त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या नैसर्गिक लेन्सवर (Natural Lens) होतो. ही लेन्स खराब होऊ लागते. डोळ्यांच्या बाहुलीवर पांढरे डाग दिसू लागतात.
परिणामी, रुग्णाला सर्व काही अस्पष्ट दिसू लागतं. धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांमध्ये स्थिती अधिक बिकट असते. शस्त्रक्रिया करून हा मोतीबिंदू हटवला जातो, जेणेकरून रुग्णाला स्वच्छ दिसू लागतं. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा स्मरणशक्तीशी असणारा संबंध आश्चर्यकारक असून, या संशोधनामुळे स्मृतिभ्रंश आणि त्यावरच्या उपचारांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.