गुडघेदुखी नाही सामान्य असू शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच घ्या दक्षता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 05:28 PM2022-09-15T17:28:44+5:302022-09-15T17:31:03+5:30

पूर्वी सांधेदुखी, गुडघे कमकुवत होणं हे आजार केवळ वृद्ध लोकांमध्ये दिसत होते. पण आता हे आजार तुलनेनं कमी वय असलेल्या लोकांनाही होत आहेत.

causes symptoms remedies for knee pain | गुडघेदुखी नाही सामान्य असू शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच घ्या दक्षता

गुडघेदुखी नाही सामान्य असू शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच घ्या दक्षता

googlenewsNext

बैठं काम, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गंभीर स्वरुपाचे आजार होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हृदयविकार, डायबेटिससोबतच सांधेदुखी, गुडघेदुखी आणि हाडांच्या विकारानेग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. पूर्वी सांधेदुखी, गुडघे कमकुवत होणं हे आजार केवळ वृद्ध लोकांमध्ये दिसत होते. पण आता हे आजार तुलनेनं कमी वय असलेल्या लोकांनाही होत आहेत.

गुडघेदुखी (Knee Pain) किंवा गुडघे कमकुवत (Weak Knee) होण्यामागे अनेक कारणं आहेत. अन्य आजार किंवा अपघातामुळे गुडघे कमकुवत होतात. तसंच लिगामेंट डॅमेज (Ligament Damage) हेदेखील गुडघे कमकुवत होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. गुडघे कमकुवत झाल्यास त्याची अन्य काही लक्षणं (Symptom) देखील दिसतात. तसंच या आजारामागे काही कारणंदेखील आहेत. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.

गुडघे कमकुवत होण्यामागं लिगामेंटला धक्का बसणं हे महत्त्वाचं कारण असतं. गुडघे एकत्र सांधून ठेवणाऱ्या लिगामेंट अर्थात अस्थिबंधांपैकी एखादं लिगामेंट डॅमेज झालं तर गुडघे कमकुवत होतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात म्हणजेच या आजाराची लक्षणं दिसताच तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं, व्यायाम सुरू करणं गरजेचं आहे.


गुडघा कमकुवत होण्यामागं काही महत्त्वाची कारणं असतात. त्यात थकवा, स्नायू कमकुवत होणं, ब्लड प्रेशर अचानक कमी होणं, ब्लड शुगर लेव्हल कमी किंवा जास्त होणं, थॉयराईड ग्रंथीच्या समस्या, डिहाड्रेशन, गुडघ्यात संसर्ग होणं, शारीरिक हालचाली कमी असणं किंवा इलियोटिबियल बॅंड सिंड्रोम यांचा समावेश असतो.

याशिवाय ऑस्टियोआर्थराइटिस (Osteoarthritis), मणक्यावर परिणाम करणारा संधिवात, स्ट्रोक, नर्व्ह डिसॉर्डर, पाठीच्या कण्याला दुखापत, गळू किंवा गाठ आणि टेंडिनायटिसमुळेदेखील गुडघे कमकुवत होणं किंवा गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय (Home Remedies) नक्कीच करू शकता.

व्हिटॅमिन सीयुक्त (Vitamin C) फळं आणि भाजीपाल्यात अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे गुडघेदुखी कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही आहारात हळद, आवळा, लिंबू, सफरचंदाच्या बियांचं व्हिनेगर यांचा समावेश करा. कॅल्शियमयुक्त जवस, अक्रोड आणि तीळ या पदार्थांचा आहारात समावेश करावा. फास्ट फूड, जंक फूड, फ्राइड फूड किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ खाणं टाळा.

गुडघेदुखीत वजन (Weight) ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. जर तुमचं वजन जास्त असेल, लठ्ठपणा असेल तर गुडघेदुखीची जोखीम आणखी वाढते. आपल्या शरीराचा भार गुडघ्यांवर पडत असतो. वजन जास्त असेल तर हा भार जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे हेल्दी डाएटच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करा. वजन कमी असेल तर गुडघेदुखीचा त्रास होणार नाही. रोजच्या आहारात फळं, भाजीपाला आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

स्नायूंमधल्या वेदना कमी करण्यासाठी हॉट अँड कोल्ड थेरेपी (Hot And Cold Therapy) फायदेशीर ठरते. जर तुम्हाला संधिवात असेल तर तुम्ही या थेरपीचा वापर करा. या थेरपीनुसार एक आईस पॅक स्वच्छ कापडात गुंडाळा आणि त्याने गुडघे शेका. याशिवाय गुडघे जखडण्याची समस्या असेल तर तुम्ही हॉट थेरपी वापरू शकता. ज्यात कापड तापलेल्या तव्यावर धरून तो शेक गुडघ्यांना द्या.

खाली बसल्यानंतर उभं राहताना त्रास होणं, गुडघे सरळ करताना वेदना होणं, गुडघे वाकवताना आवाज येणं,जळजळ झाल्यासारखं वाटणं, गुडघ्यावर लालसरपणा दिसणं, अस्थिरता, सूज येणं किंवा आखडल्यासारखं वाटणं ही गुडघेदुखीची प्रमुख लक्षणं आहेत. गुडघे कमकुवत झाल्यास किंवा गुडघेदुखी तीव्र असल्यास तुम्ही घरगुती उपायांसोबतच वैद्यकीय उपचारदेखील सुरू करावेत. तसंच गुडघ्यांमधली वेदना दूर व्हावी यासाठी फिजिओथेरपिस्ट किंवा प्रोफेशनल जिम ट्रेनरची मदत घेऊ शकता. नियमित व्यायाम केल्याने गुडघ्यांशी निगडीत समस्या निश्चितच दूर होऊ शकतात.

Web Title: causes symptoms remedies for knee pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.