हाता पायाला मुंग्या येतात? क्रॅम्प्सही येतात? ही असू शकतात 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 05:24 PM2022-09-06T17:24:04+5:302022-09-06T17:27:21+5:30

हाता-पायाला मुंग्या येणं, पेटका (Cramps) येणं, स्नायू आखडले जाणं (Muscle Contraction) यांसारखे त्रास अनेकांना जाणवतात. असं होण्यामागे योग्य पोषणतत्त्वांची, जीवनसत्त्वांची कमतरता (Vitamin Deficiency) हे कारण असू शकतं.

causes symptoms remedies of Vitamin B deficiency | हाता पायाला मुंग्या येतात? क्रॅम्प्सही येतात? ही असू शकतात 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं

हाता पायाला मुंग्या येतात? क्रॅम्प्सही येतात? ही असू शकतात 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं

Next

अनेक वेळा आपल्याला विविध रोगांना, आजारांना तोंड द्यावं लागतं. त्यामागचं मुख्य कारण अनियमित आहार किंवा कामाच्या व्यापात आहाराकडे झालेलं दुर्लक्ष हे असतं. कोणताही थंड पदार्थ खाल्ल्यावर सर्दी, खोकला तर कधी-कधी तापही येतो. यामागचं आणखी एक कारण म्हणजे शरीरातल्या रोगप्रतिकारशक्तीचा स्तर कमी झालेला असतो. म्हणूनच तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. हाता-पायाला मुंग्या येणं, पेटका (Cramps) येणं, स्नायू आखडले जाणं (Muscle Contraction) यांसारखे त्रास अनेकांना जाणवतात. असं होण्यामागे योग्य पोषणतत्त्वांची, जीवनसत्त्वांची कमतरता (Vitamin Deficiency) हे कारण असू शकतं. ऐकून धक्का बसला ना? मग तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे, की कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे घडू शकतं.

एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहिलो किंवा आपला हात किंवा पाय एका विशिष्ट स्थितीत काही काळ राहिला तर आपल्या हाताला-पायाला मुंग्या येतात. जीवघेणी कळ येणारा पेटका येऊ शकतो. बर्‍याच वेळा झोपेत एका कुशीवर जास्त वेळ झोपलो तर हातापायात गोळे येतात. हा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला असतो. हे असं होण्यामागचे कारण म्हणजे स्नायूंचं चलनवलन (Lack of Muscle Movement) न झाल्याने हाता-पायांवर ताण येतो, स्नायू आखडले जातात.

स्नायू आखडले गेल्याने रक्ताभिसरण (Uneven Blood Circulation) अनियमित होतं किंवा काही काळासाठी थांबतं; पण केवळ हेच कारण नसून शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील हे घडू शकतं. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist) आणि डाएटिशियन (Dietician) गरिमा गोयल ह्यांनी 'ओन्लीमायहेल्थ डॉट कॉम'ला दिलेल्या माहितीत हा खुलासा केला आहे.

डॉ. गरिमा गोयल म्हणाल्या, की काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे शरीरातले स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे कायमस्वरूपी इजादेखील होऊ शकते. ज्या वेळेस रक्तवाहिन्या दुखावल्या जातात, त्याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो. रक्ताभिसरण अनियमित झाल्याने जे रक्त वाहिन्यांमध्ये साचून राहतं, त्यामुळेच मग ब्लॉकेजेसची (Blockages in Blood Veins) समस्या उद्भवू शकते.

डॉ. गरिमा गोयल यांच्या मते आपल्या नियमित आहारात वरच्या व्हिटॅमिन्सचं प्रमाण संतुलित नसतं आणि त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषणतत्त्वं मिळत नाहीत. त्या कमतरतेमुळे अनेक परिणाम घडू शकतात. त्यातला एक परिणाम म्हणजे हातापायात मुंग्या येणं. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असेल तर हाता-पायाला पिन किंवा सुई टोचत असल्यासारखं वाटत राहतं. याचं कारण शरीरातली उपलब्ध व्हिटॅमिन्स ही नर्व्हस सिस्टीमला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असतात, जेणेकरून नर्व्हस सिस्टिम आपलं काम करू शकेल.

- व्हिटॅमिन बी 12 हे स्नायू आणि वाहिन्यांभोवती सुरक्षा कवच बनवण्याचं काम करतं. त्यामुळे वाहिन्यांना कुठलीही इजा होत नाही. नसा किंवा स्नायू आखडणं हे बहुतांशवेळा हाता-पायांच्या बाबतीतच होते, ज्याला वैद्यकीय भाषेत पेरिफेरल नर्व्ह म्हटलं जातं; पण ज्या वेळेस या नर्व्ह सिस्टिमलाच इजा पोहोचते त्या वेळेस मुंग्या येणं, पेटका किंवा गोळा येणं, स्नायू आखडणं या समस्या उद्भवतात. व्हिटॅमिन बी 1, बी 6, बी 9 आणि व्हिटॅमिन ई यांसारखी अ‍ॅटिऑक्सिडंट्सदेखील नर्व्हस सिस्टिमला सक्षम बनवण्याचंच काम करतात.

- डॉ. गरिमा गोयल यांच्या मते आहाराच्या अनियमित वेळा आणि दगदगीची जीवनशैली ह्यामुळे शरीरास उपयोगी अशी पोषणतत्त्वं मिळत नाहीत. योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास शरीराला आवश्यक ती घटकद्रव्यं आणि पोषणतत्त्वं (Nutritions) मिळतात. ही उपयुक्त व्हिटॅमिन्स पुढीलप्रमाणे :

1. व्हिटॅमिन बी 1ची कमतरता भरून काढण्यासाठी धान्यं, फळभाज्या, विविध प्रकारच्या डाळी, सुकामेवा आणि मांसाहार आदींचा आहारात समावेस असावा. तसं असल्यास हे व्हिटॅमिन विपुल प्रमाणात मिळतं.

2. व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता भरून काढण्यासाठी बटाटा, सुका मेवा, पौष्टिक धान्यं, कडधान्यं, मासे, चिकन यांचा आहारात समावेश असणं आवश्यक आहे. फक्त आंबट फळं किंवा पदार्थ वर्ज्य करावेत.

3. व्हिटॅमिन बी 9 ची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, राजमा, फळभाज्या, सगळी द्विदल धान्यं-डाळी, सूर्यफुलाचं बी यांचा आहारात समावेश करावा लागतो.

4. व्हिटॅमिन बी 12ची कमतरता भरून काढण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ, दही, पनीर यांचं नियमित सेवन गरजेचं असतं. त्याशिवाय हिरव्या पालेभाज्या, चिकन आणि मासे यातही व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असतं.

5. व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी सुका मेवा आणि डाळी ह्यांचा आहारात समावेश करावा. तसंच हिरव्या पालेभाज्यांसोबत अन्न शिजवताना व्हेजिटेबल ऑइलचा वापर करावा.

हातापायात मुंग्या येणं, स्नायू आखडणं ही समस्या काही वेळाने ठीक होते. परंतु, आपल्यापैकी कुणालाही ही समस्या सतत उद्भवत असेल, तर त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणंच इष्ट आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसारच योग्य ते उपचार करावेत.

Web Title: causes symptoms remedies of Vitamin B deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.