केवळ जंकफूडमुळे नाही तर स्वच्छतेच्या केमिकल्समुळेही वाढतं मुलांचं वजन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 10:03 AM2018-09-21T10:03:56+5:302018-09-21T10:04:29+5:30
वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे तुम्ही ऐकली असतील. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधातून असे समोर आले की, स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या किटाणुनाशक आणि इतर केमिकल्समुळे लहान मुलांचं वजन वाढतं.
वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे तुम्ही ऐकली असतील. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधातून असे समोर आले की, स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशक आणि इतर केमिकल्समुळे लहान मुलांचं वजन वाढतं. एका नव्या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, फिनाईल, हारपिक, लायझोल आणि इतरही अन्य उत्पादनांमुळे लहान मुलांमधील 'गट मायक्रोब्स' (मानवी पचन तंत्रात राहणारे सूक्ष्म जीव) वर प्रभाव पडतो. याने लहान मुलांमधील वजन वाढू शकतं.
कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये याबाबतचा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी कॅनडातील अल्ब्रेटा यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी ३ ते ४ महिन्यांच्या ७५७ नवजात बालकांच्या 'गट मायक्रोब्स'चं विश्लेषण केलं. अभ्यासादरम्यान घरात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशक, स्वच्छतेसाठी वापरली जाणारी सामग्री यांचं विश्लेषण करताना मुलांचं वजन केलं गेलं.
या अभ्यासातून असे आढळले की, घरात कीटकनाशकांचा जास्त वापर केला गेल्याने ३ ते ४ महिन्यांच्या बालकांच्चाय गट मायक्रोब्समध्ये बदल झाला. त्यांना आढळले की, इतर डिटर्जंट आणि स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर उत्पादनांमुळे मुलांवर असा प्रभाव पडला.
मुलांमध्ये वजन वाढण्याची इतर कारणे
- जास्तीत जास्त लहान मुले आठवड्यातून २४ तास टीव्ही बघतात. याव्यतिरिक्त मुलं ऑनलाइन व्हिडीओ गेम खेळतात. अनेक सर्वेमधून ही बाब स्पष्ट झाली आहे की, जास्त टीव्ही पाहिल्याने लहान मुलांमध्ये वजन वाढण्याचा धोका वाढतो. अभ्यासकांनी सांगितले की, टीव्ही बघितल्याने लहान मुलांमधील शारीरिक हालचाली कमी होतात आणि याने वजन वाढतं.
- एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की, श्रीमंत घरातील लहान मुलं घरी पौष्टिक आहार घेण्याऐवजी बाहेर जंकफूडचं अधिक सेवन करतात. याप्रकारचे पदार्थ खाल्याने वजन वाढतं. जी मुलं जेवण केल्यानंतर बसून राहतात, त्यांच्या शरीरावरही अतिरीक्त चरबी होते.
- अभ्यासाचा वाढता ताण आणि खेळणे किंवा शारीरिक व्यायाम कमी होत असल्याने लहान मुलांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे. शाळेतील मुलं होमवर्क पूर्ण करण्याच्या नादात जेवणच करत नाहीत आणि इतर काही काही खाऊन पोट भरतात.
- २०११ मध्ये लहान मुलांच्या विकासावर आधारित एका अभ्यासानुसार, ज्या महिला ऑफिस जातात, त्यांची मुलं घरी राहणाऱ्या महिलांच्या मुलांच्या तुलनेत जास्त जाड असतात.