पोटात ‘चक्का जाम’ हाेताेय, हे नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 09:50 AM2023-12-17T09:50:07+5:302023-12-17T09:50:20+5:30
पोट साफ का होत नाही, या एकाच प्रश्नाचे उत्तर रुग्ण शोधत असतात. त्यात कुटुंबातील सदस्यही विविध प्रकारचे सल्ले देत असतात.
- डॉ. अमित मायदेव
चेअरमन, पोटविकार विभाग, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल
बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) म्हणजे शौचास साफ न होणे, या अशा स्वरूपाची व्याख्या नागरिकांनी केलेली असते. बद्धकोष्ठता अगदीच सर्वसामान्य आरोग्य समस्या आहे. पचन प्रक्रिया योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे हे एक लक्षण आहे. बद्धकोष्ठतेचे विविध प्रकार आहेत. ७० टक्के नागरिकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची बद्धकोष्ठता असते. पोटाच्या डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचे रुग्ण मोठ्या संख्येने असतात. डिसेंबर महिना बद्धकोष्ठता जनजागृती म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त या आजाराविषयी आपणास काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.
पोट साफ का होत नाही, या एकाच प्रश्नाचे उत्तर रुग्ण शोधत असतात. त्यात कुटुंबातील सदस्यही विविध प्रकारचे सल्ले देत असतात. बद्धकोष्ठतेचे चार प्रकार आहेत. पहिला म्हणजे अनेकांना सकाळी शौचास जाण्याची इच्छाच होत नाही, दुसऱ्या प्रकारात स्टूल खूप कडक असल्याने शौचास होत नाही. तिसरे, स्टूल कडक होते ते पास होण्यासाठी काहींना अनेक वेळा शौचालयात बसून राहावे लागते, तर चौथ्या प्रकारात काहींना वारंवार शौचास जावे लागते. पोट साफ न झाल्यासारखे वाटते, त्यामुळे दिवसातून ते तीन-चार वेळा शौचास जातात. पोट दिवसभर जड राहते, फुगलेले असते. कामात लक्ष लागत नाही. आळस वाढतो, त्यामुळे वजन वाढते.
बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यावेळी मल मोठ्या आतड्यात अडकून राहतो. ‘स्टूल फॉर्मेशन’साठी आपण फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. त्यामध्ये हिरव्या आणि फळभाज्यांचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे. पचन प्रकियेत चांगले रस असणे गरजेचे आहे. ज्यामुळे मोठ्या आतड्यातील मल लगेच बाहेर पडेल. या आजाराचे योग्य पद्धतीने निदान करून उपचार घेणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना वारंवार शौचास जावे लागते, त्यांना इरिटेबल बाऊल सिन्ड्रोमचा (आयबीएस) त्रास असू शकतो. या व्यक्ती तणावात असतात. सतत काही तरी विचार करत असतात, त्यांचे मन शांत नसते.
रुग्णाची हिस्ट्री घेतल्यानंतर आम्ही त्यांनी सांगितल्यानंतर कोलोन्सोकोपी आणि स्टूल टेस्ट या दोन चाचण्या करून नेमका त्रास कशामुळे आहे, याचे निदान करून त्यानुसार उपचार सुरू करतो. काही वेळा पोटविकाराशी संबंधित बाजारात उपलब्ध असलेल्या औषधाचा मारा करत राहणे योग्य नसते. विशेष म्हणजे योग्य निदानाने हा आजार बरा होऊ शकतो. काही वेळा तर रुग्णांना शौच कशा पद्धतीने करावे याची माहिती नसते, त्यांची बसण्याची पद्धत आणि शौच करण्याची पद्धत चुकीची असल्याचे लक्षात येते. गुदद्वाराची म्यानोमॅट्री ही चाचणी करून या गोष्टी सहज कळून येतात. त्याचे निदान करून औषधोपचार केले जातात. विशेष म्हणजे २-३ महिन्यांपासून बद्धकोष्ठता हे मोठ्या आतड्याचे कर्करोगाचे लक्षण असू शकते. मात्र या आजाराचे वेळीच निदान केल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी हे उपाय करा
नियमितपणे भरपूर पाणी प्या.
आहारात फळभाज्यांच्या वापर करा.
पोट फुगेपर्यंत खाऊ नका. व्यायाम करा.
रात्री जेवण केल्यानंतर किमान
२० -३० मिनिटे शांत चाला.
जेवणानंतर तत्काळ झोपू नये.
तेलकट, तिखट, फास्ट फूड खाणे टाळावे.