बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवाताचा धोका अधिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 05:43 PM2018-10-11T17:43:26+5:302018-10-11T17:49:10+5:30
पूर्वीच्या तुलनेत आता संधिवात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नियमित व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, मोबाईल व संगणकावर तासनतास चिकटून राहणे यासह बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका अधिक आहे
वाशिम: पूर्वीच्या तुलनेत आता संधिवात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नियमित व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, मोबाईल व संगणकावर तासनतास चिकटून राहणे यासह बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका अधिक आहे, असे स्पष्ट मत वाशिम येथे अस्थिरोग तथा संधिवात रोग तज्ज्ञ डॉ. सुनील राठोड यांनी व्यक्त केले. संधिवात निवारण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी केलेल्या खास बातचीतदरम्यान ते बोलत होते.
प्रश्न : संधिवात म्हणजे काय?
डॉ. राठोड - संधिवाताला सांधेदुखी असेही म्हटले जाते. आपल्या सांध्यामध्ये ‘कुर्चा’ नावाचा घटक असतो. या ‘कुर्चा’मुळे सांध्यांची हालचाल योग्यरित्या होत असते. जेव्हा याची झीज व्हायला सुरूवात होते, सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासतात, त्यामुळे सांध्यात वेदना आणि सूज येऊ लागते. या स्थितीस संधिवात असे म्हटले जाते.
प्रश्न : संधिवाताची लक्षणे कोणती?
डॉ. राठोड - सांधे दुखणे, सुजणे, सांधे जाम होणे, कडकपणा येणे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर सांधे अवघडल्यासारखे होणे व चालता न येणे, अशक्तपणा जाणवणे ही संधिवाताची सुरूवातीचे लक्षणे आहेत. तीव्र स्वरुपाच्या संधिवातात सांधे वाकडे होऊ शकतात. सांध्याची वाकण्याची क्षमता कमी होते आणि रुग्णाला उठणे, बसणेही अशक्य होऊन जाते.
प्रश्न : संधिवात प्रामुख्याने कोणत्या वयोगटात होण्याचा धोका अधिक संभवतो?
डॉ. राठोड - संधिवात हा लहान मुलांपासून ते वयोवृद्धांना होऊ शकतो. वाढत्या वयानुसार याचे प्रमाण वाढते. पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये संधिवाताचे प्रमाण जास्त आढळते. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही संधिवाताचे प्रमाण वाढत चालले आहे. साधारणत: चाळीशीनंतर संधीवात होण्याचा धोका अधिक संभवतो.
प्रश्न : संधिवाताची कारणे काय असू शकतात?
डॉ. राठोड - बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, स्थूलपणा येणे, नियमित व्यायाम न करणे, समतोल आहाराची कमतरता, एकाच सांध्यावर नियमितपणे भार पडत राहणे, मोबाईल व संगणकावर तासनतास चिटकून राहणे, हाडांचे फ्रॅक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी आघात झाल्याने, अनुवंशिकतेमुळेही संधिवात होण्याचा धोका अधिक असतो. सांध्यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे सांधे खराब होऊ शकतात.
प्रश्न : संधिवात होऊ नये म्हणून नागरिकांनी कोणती दक्षता घ्यायला हवी?
डॉ. राठोड - नियमित व्यायाम करणे, आहाराचा योग्य समतोल राखणे, मोबाईल किंवा संगणकावर जास्त वेळ न राहणे, हाडांना इजा होणार नाही याची दक्षता घेणे, गुडघ्यांचा संधीवात असलेल्या रुग्णांनी खाली मांडी घालून न बसणे, पायरीवरून चढउतार कमी करणे आदी दक्षता घेता येतील.