चिंताजनक : स्वस्त इंटरनेट पॅकमुळे वाढत आहे तरुणांमधील मानसिक आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 11:08 AM2018-10-10T11:08:01+5:302018-10-10T11:10:57+5:30
स्वस्त होत असलेल्या इंटरनेटच्या दरांमुळे नेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
नवी दिल्ली - टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धेमुळे गेल्या काही काळापासून इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मात्र या स्वस्त होत असलेल्या इंटरनेटच्या दरांमुळे नेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, इंटरनेटचा अतिरेकी वापर लोकांना मानसिक रोगी बनवत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
इंटरनेटच्या अतिरिक्त वापरामुळे तरुणांच्या मेंदूवर परिणाम होत आहे. त्यामुळे चिडचिडेपणा, राग, अस्वस्थता, एकटेपणा आणि विचारांवर नियंत्रण न राहणे असा समस्यांनी तरुणाईला ग्रासले आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्यांमध्ये १६ वर्षांपर्यंतच्या मुलांचे प्रमाणही चिंताजनक आहे. १६ वर्षांपर्यंतच्या मुलांलैकी १३ टक्के मुले मानसिक आजारांनी ग्रस्त असल्याचे लखनौमधील केजीएमयू रुग्णालयातील मानसिक रुग्ण विभागातील डॉक्टर विवेक अग्रवाल यांनी सांगितले.
शिक्षण आणि कामाचा दबाव, लैंगिक आणि शारीरिक शोषण, नशा आणि पारिवारिक समस्यांमुळे तरुणांमधील आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. जीवनात यशस्वी होण्याचा दबाव तरुणांना मानसिकदृष्ट्या त्रस्त करत आहे. त्यामुळे प्रकरण आत्महत्येपर्यंत पोहोचत आहे.
दरम्यान, देशातील दर चारजणांपैकी एक जण मानसिक दृष्ट्या आजारी आहे. अशा लोकांना उपचारांची गरज आहे. मात्र या रुग्णांपैकी ९० टक्के जण स्वत:ला आजारा मानतच नाही. हळुहळू त्यांची समस्या गंभीर होते आणि त्यांच्यावर इलाज करणे दुरापास्त होते, असे डॉ. भूपेंद्र यांनी सांगितले.
मानसिक आजार सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर त्यावर औषधाशिवाय इलाज होऊ शकतो. सुरुवातीच्या काळात समुपदेशनातून हा आजार दूर होऊ शकतो, असे डॉक्टर सांगता. व्हर्चुअल जगापासून दूर राहणे हा या मानसिक आजारांपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत अधिकाधिक वेळ घालवावा, असा सल्ला डॉक्टर देतात.