‘चिडका बिब्बा’! - मुलांची झोप जर पूर्ण होत नसेल तर ती अशीच राहतील किरकिरी..
By Admin | Published: May 27, 2017 04:10 PM2017-05-27T16:10:11+5:302017-05-27T16:10:11+5:30
तुमच्या मुलांना रात्री वेळेवर झोपायची सवय तुम्ही लावली आहे? - तरच ती राहतील आनंदी आणि हुशार. नाहीतर..
- मयूर पठाडे
आपली झोप झालेली नसेल, तर दुसरा दिवस किती डल जातो ना? काहीच सुचत नाही. काहीच करावंसं वाटत नाही. अख्खा दिवस आळसावलेला जातो. उत्साह नावाची तर गोष्टच नसते. कंटाळा येतो. काहीच करण्यात रस नसतो.. सगळं चैतन्यच हरवलेलं असतं.
पण तेच झोप जर व्यवस्थित झालेली असेल, पुरेशी झोप घेतलेली असेल, तर दिवसभर आपल्या अंगात उत्साह कसा फसफसलेला असतो. सगळी कामंही झपाट्यानं होतात.
थोडक्यात झोप आणि आपलं आरोग्य यात अत्यंत जवळचा संबंध आहे.
पण लहान मुलांच्या बाबतीत तर हे आणखीच खरं आहे. पण बऱ्याच पालकांची तक्रार असते, आमची मुलं वेळेवर झोपत नाहीत, उठत नाहीत, उठवलं तरी उठत नाहीत आणि अगदीच बळजबरी केली, तर मग किरकिर, रडारड करतात.. काय करावं हेच आम्हाला सुचत नाही..
१- मुलं जर रोज योग्य आणि ठराविक वेळा झापायला गेली तरच त्यांची झोप पूर्ण होते आणि त्यांना पुरेसा आराम मिळतो.
२- मुलांची झोप जर पूर्ण झाली नाहीतर त्यांच्या वाढीवर तर परिणाम होतोच, पण भविष्यकाळावरही त्याचा परिणाम होतो आणि त्यांची ती लाइफस्टाइलच बनून जाते.
३- पूर्ण आणि शांत झोप जर मुलांना लागत नसेल, तर त्यानं किती प्रॉब्लेम्स त्यांच्यात तयार व्हावेत?
४-अपुऱ्या झोपेमुळे मुलांची एकाग्रता कमी होते. त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो.
५- अभ्यासावर परिणाम होतो. शालेय अभ्यासात ती मागे पडू शकतात. त्यांचे परिक्षेतले गुण कदाचित ‘उत्तम’ दिसत असले तरीही एकतर तो घोकंपट्टीचा परिणाम असतो, किंवा त्यापेक्षा कमी अभ्यास करूनही त्यांनी अधिक ज्ञान संपादन केलं असतं.
६- अशा मुलांचा सामाजिक सहभाग तुलनेनं बराच कमी असतो. ती एकलकोंडीही असू शकतात.
७- मुलं कायम किरकिरी आणि चिडचिडीच राहातात.