मुलांचं बालपण जपा, नाहीतर ती होतील अकाली ‘प्रौढ’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2017 06:15 PM2017-05-24T18:15:49+5:302017-05-24T18:15:49+5:30
लहान वयातच मुलांवर नको त्या जबाबदार्या पडल्या तर कोमेजेल बालपण..
Next
- मयूर पठाडे
मुलांचं लहानपण जितकं सुखात, आनंदात आणि पालकांच्या छत्रछायेखाली उबदार वातावरणात जाईल, तितकी ती मुलं भविष्यात जबाबदार नागरिक बनतील, हे एव्हाना सिद्ध झालेलं आहे.
त्यामुळेच ज्यांचं बालपण विपरित परिस्थित किंवा गुन्हेगारी जगताच्या पार्श्वभूमीवर गेलेलं आहे, अशा व्यक्ती त्यांच्या उत्तरायुष्यात गुन्हेगारच बनल्याचं आढळून येतं.
तुरुंगात असलेल्या अनेक नामचिन गुंडांचा आणि त्यांच्या पुर्वायुष्याचा अभ्यास केल्यावर ते ‘असे’ का झाले याचं उत्तर त्यांच्या बालपणातच सापडतं. या गुन्हेगारांनी स्वत:ही त्याबद्दल ‘परिस्थिती’लाच दोष दिलेला आहे.
याचा अर्थ गुन्हेगारी वातावरणात वाढलेली प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच बनेल असं नाही, पण गैरमार्गाकडे वळण्याची त्यांची शक्यता खूप जास्त असते.
त्यामुळे पालकांनो, लक्षात ठेवा, आपली परिस्थिती जरी गरिबीची असेल, तरीही लहान वयातच आपल्या मुलामुलींना कामाला जुंपू नका. नको त्या वयात त्यांना न झेपणार्या जबाबदार्या सोपवल्या तर त्यांचं बालपण नक्कीच कोमेजेल आणि त्यांना अकाली प्रौढत्वही येईल.