Child Health: लहान मुले लठ्ठ का होतात? आहेत अशी कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 05:36 AM2022-08-28T05:36:25+5:302022-08-28T05:37:30+5:30
Child Health: जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार अतिरिक्त चरबीमुळे रोगांचा धोका वाढतो. यामुळे विविध प्रकारचे कर्करोग, मधुमेह, हृदयाचे आणि फुप्फुसांचे आजार बळावू शकतात आणि त्यामुळे त्यांना कमी वयातच अशा आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
- डॉ. संजय बोरुडे
स्थूलत्व शल्यचिकित्सक
लठ्ठपणा म्हटलं की, आपल्याला वाटतं हा आजार केवळ तरुण आणि प्रौढांमध्ये आढळतो; परंतु गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमधील लठ्ठपणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. यामुळे कोवळ्या वयात मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवू लागल्याने पालकांसाठी हे चिंतेचे कारण बनले आहे. हा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की आज अनेक लहान मुलांच्या रुग्णालयांमध्ये लठ्ठपणावरील उपचारासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.
आपली मुले गुटगुटीत आहेत, या गैरसमजातून बाहेर येऊन आपली मुले सुदृढ आहेत का? यावर पालकांनी विचार करायची गरज आहे. मुलं हट्ट करतात म्हणून त्यांना जंक फूड, साखरयुक्त पेय आपण देत असतो; पण आपण भविष्यात त्याच्या आरोग्याच्या समस्येला निमंत्रण तर देत नाही आहोत ना? हा प्रश्न पालकांना पडला पाहिजे. साधं जेवण देणं आजकाल दुरापास्त झाले आहे. बहुतांश लोक चमचमीत जेवणाच्या प्रेमात असतात. एखाद्या वेळेस ठीक आहे. मात्र, आपल्याकडे चरबीयुक्त आहार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. परिणामी मुलं लठ्ठ होतात. त्याचबरोबर जेनेटिक आणि हॉर्मोनल बदल यामुळेसुद्धा अनेक लहान मुलांमध्ये लठ्ठपणा येत असल्याचे दिसून येत आहे. योग्य वेळी उपचार केले तर लठ्ठपणा कमी केला जाऊ शकतो, त्यावर उपाय आहेत. गेल्या काही वर्षांपासून लठ्ठपणा हा आजार असून, त्यामुळे विविध रोगांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे.