गर्भातच मुलाला मिळेल आजारातून मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 01:31 AM2017-08-08T01:31:54+5:302017-08-08T01:32:02+5:30
शास्त्रज्ञांनी प्रथमच हृदयरोगाला कारण ठरणाºया खराब डीएनएचा एक भाग भ्रूणातून वेगळे करण्यात यश मिळवले आहे. या माध्यमातून जवळपास १० हजार अनुवांशिक आजार असलेल्यांवर उपचार होण्याची आशा आहे.
शास्त्रज्ञांनी प्रथमच हृदयरोगाला कारण ठरणाऱ्या खराब डीएनएचा एक भाग भ्रूणातून वेगळे करण्यात यश मिळवले आहे. या माध्यमातून जवळपास १० हजार अनुवांशिक आजार असलेल्यांवर उपचार होण्याची आशा आहे. अनुवांशिक आजार हे अनेक पिढ्या टिकून राहतात.
या अभ्यासातून नवे औषध तयार होण्याची शक्यता असताना असे करणे हे नैतिकतेच्या दृष्टीतून योग्य आहे का, असेही विचारले जाऊ लागले आहे. डीएनएमध्ये बदल घडवण्याच्या तंत्रज्ञानामुळे विज्ञान आज त्याच्या सुवर्णयुगात आहे. २०१५ मध्ये क्रिस्पर या तंत्रज्ञानाची मोठी कामगिरी यात आहे. औषधांतही याचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या माध्यमातून अनुवांशिक दोष (सीस्टिक फायब्रोसिसपासून ते स्तनाचा कर्करोग) शरीरातून पूर्णपणे बाहेर काढले जातात. अमेरिकेची आॅरेगन हेल्थ अँड सायन्स युनिवर्सिटी आणि साल्क इन्स्टिट्यूटसोबत दक्षिण कोरियाची इन्स्टिट्यूट फॉर बेसिक सायन्सच्या तुकडीने हायपरट्रॉफिक कार्डियोमायोपॅथीवर जास्त भर दिला. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या या तुकडीने गर्भाला पाच दिवसांचे होऊ दिले.
अभ्यासात म्हटले आहे की, प्रत्येक ५०० व्यक्तीत असा आजार असतो व त्यामुळे हृदय केव्हाही थांबू शकते. डीएनएच्या कोणत्या तरी जीनमधील दोषामुळे, असे घडते व अशा आजाराच्या कोणत्याही व्यक्तीच्या मुलामध्येही तो होण्याची शक्यता ५० टक्के असते. अनुवांशिकतेत सुधारण्याची ही प्रक्रिया गर्भ राहण्याच्या वेळेत केली गेली. हायपरट्रॉफीक कार्डियोमायोपॅथीने त्रस्त व्यक्तीचे वीर्य डोनेट केलेल्या निरोगी अंडाशयात इंजेक्शनद्वारे टाकले गेले व त्यासोबत दोष दूर करण्यासाठी क्रिस्पर तंत्रज्ञान वापरले गेले. हा प्रयोग वारंवार यशस्वी ठरत नाही परंतु यामुळे ७२ टक्के गर्भांना फायदा झाला आहे. हे तंत्रज्ञान किती सुरक्षित आहे हे आज सांगता येणार नाही त्याला वेळ लागेल, असे या संशोधन तुकडीचे सदस्य डॉ. शौखरात मितालीपोव्ह म्हणाले.