लहान मुलांमध्ये साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण; गॅस्ट्रोच्या तक्रारी अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 04:10 PM2020-09-17T16:10:24+5:302020-09-17T16:16:51+5:30
अपचन, पोटदुखी, उलटी-जुलाब ही गॅस्ट्रोची प्रमुख लक्षणे
पुणे : सध्या सामान्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत कमालीची भीती पहायला मिळत आहे. सॅनिटायझरचा वापर, भाज्या धुवून वापरणे अशा सवयी दैनंदिन व्यवहाराचा भाग झाल्या आहेत. तरीही, सध्या लहान मुलांमध्ये साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. निकृष्ट दर्जाच्या सॅनिटायझर्सचा वापर, भाज्या धुण्यासाठी वापरलेले अस्वच्छ पाणी साथीच्या आजारांना आमंत्रण देत आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसारख्या आजाराच्या तक्रारी वाढल्या आहेत.
दूषित पाणी, दूषित अन्न यामुळे गॅस्ट्रो एन्टरायटिसचा त्रास होतो. अपचन, पोटदुखी, उलटी-जुलाब ही गॅस्ट्रोची प्रमुख लक्षणे आहेत. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील १२ ते ७२ तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. अनेकदा ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसतात. लहान मुलांची अतिसार व उलटी होत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होते, अशक्तपणा वाढतो. ओटीपोटात वेदना, उलट्या, सैल हालचाली, ताप, भूक न लागणे, सतत होणारी वांती, सूजलेले डोळे, सुस्तपणा, मलमध्ये रक्त आणि अगदी लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला वैद्यकतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. गॅस्ट्रोचा त्रास होत असल्यास पाणी पिणे सर्वात उत्तम मानले जाते. फळांचे रस, शहाळ्याचे पाणी वगैरे पिणेही हितकारक ठरते. या काळात डॉक्टर सॉफ्ट ड्रिंक्स टाळण्याचा सल्ला देतात.
--------------------
लहान मुलांना खाण्यापूर्वी हात धुण्याची सवय लावावी. पालकांनी मुलांच्या आहाराकडे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कटाक्षाने लक्ष द्यावे. पावसाळ्यात व त्यानंतरही पाणी उकळून व गाळून पिणे फायद्याचे ठरते. पालेभाज्या, फळे वापरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्या. लहान मुलांना रोटाव्हायरसची लस अवश्य द्या. या लसीमुळे बाळाचा साथीच्या आजारापासून बचाव करता येऊ शकतो. बालरोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित आणि योग्य उपचार गरजेचे ठरतात. मुलांना या काळात ओआरएस, झिंक आणि प्रोबायोटिक्स द्यावे. विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उकळून थंड केलेले पाणी व योग्य पध्दतीने शिजवलेल्या अन्नाचा वापर करावा.
- डॉ. अंशु सेठी, बालरोगतज्ज्ञ
----------------------
काय काळजी घ्यावी ?
- स्वयंपाकाची जागा कायम स्वच्छ ठेवावी.
- स्वच्छ पाणी आणि उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
- शिळे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
- जेवणाआधी आणि जेवणानंतर, बाहेरुन आल्यावर हात स्वच्छ धुवावेत.
- जास्त त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.