रोज कॉफी प्यायल्याने 'या' गंभीर आजारांचा धोका होतो कमी; इतके कप पिणे ठरेल फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 04:52 PM2023-04-09T16:52:14+5:302023-04-09T16:53:04+5:30
Coffee Benefits: कॅफिनचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म 3 ते 11 टक्क्यांनी वाढतं.
स्लिम राहण्यासोबतच कॉफीचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोकाही कमी होतो. स्वीडिश संशोधकांचे म्हणणे आहे की, दिवसभरात 3 कप कॉफी प्यायल्याने शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि मधुमेहाच्या समस्येपासून आराम मिळतो. संशोधकांना असे आढळून आले की शरीरात कॅफिनचे प्रमाण जितके जास्त असेल तितका लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी असतो. स्टॉकहोममधील कारोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या डॉ सुसाना लार्सन यांच्या मते, कॅलरी-मुक्त, कॅफिनयुक्त पेये लठ्ठपणाचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, परंतु यासाठी आणखी बरेच अभ्यास करणे आवश्यक आहे.
इतर संशोधकांचे म्हणणे आहे की कॅफिनचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म 3 ते 11 टक्क्यांनी वाढतं. कॉफीचे सेवन केल्याने मधुमेह तसेच लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो, असे काही संशोधनातून समोर आले आहे. अलीकडेच या विषयावर आणखी एक अभ्यास समोर आला आहे जो बीएमजे मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की दररोज 3 ते 5 कप कॉफी प्यायल्याने या सर्व समस्यांचा धोका कमी होतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचे मत काय आहे ते जाणून घेऊया...
शरीरासाठी फायदेशीर आहे कॉफी
मॅक्स हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, एंडोक्राइनोलॉजी डॉ. साकेत कांत म्हणतात की, कॉफी वजन कमी करण्यासाठी, शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि अन्न खाल्ल्यानंतर क्रेविंग शांत करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. डॉ. कांत यांनी सांगितले की, कॅफिन व्यतिरिक्त, कॉफीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज आणि फायबरसारखे अनेक प्रकारचे कम्पाऊंड आढळतात जी तुमची साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
डॉ. साकेत म्हणाले, 'जर तुम्हाला आधीच साखरेची समस्या असेल तर 200 मिलीग्राम कॉफी प्यायल्याने तुमची साखरेची पातळी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. डॉ. साकेत कांत यांनी सांगितले की, कॉफीबाबत नर्सेस हेल्थ स्टडी (Nurses' Health Study) और हेल्थ प्रोफेशनल स्टडीमध्ये अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात 42 हजार पुरुष आणि 84 हजार महिलांचा समावेश असून या सर्वांचा 12 ते 18 वर्षे अभ्यास करण्यात आला.
अभ्यासाच्या निकालांमध्ये असे आढळून आले की दिवसातून 6 कप कॉफी घेतल्याने पुरुषांमध्ये मधुमेहाचा धोका 54 टक्क्यांनी कमी झाला आणि 4 ते 5 कप कॉफी घेतल्याने मधुमेहाचा धोका 30 टक्क्यांनी कमी झाला. त्याच वेळी, दररोज 5 कपपेक्षा जास्त कॉफीचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये मधुमेहाचा धोका 30 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.
डॉ. साकेत कांत यांनीही कॉफी पिण्याचे काही तोटे सांगितले आहेत. ते म्हणाले, 'मोनोपॉजनंतर महिलांनी कॉफीचे सेवन कमी करावे. या काळात जास्त कॉफी प्यायल्याने हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, कोलेस्टेरॉलची समस्या आणि हृदयाशी संबंधित धोकाही वाढू शकतो. यासोबतच त्यांनी हेही सांगितले की, ज्या महिला गरोदर आहेत किंवा स्तनपान करतात त्यांनीही कॅफिनचे प्रमाण कमी ठेवावे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"