साध्या डुलकीपेक्षा ‘कॉफी नॅप’ भारी, आळस उडून येईल तरतरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:35 PM2018-12-03T16:35:59+5:302018-12-03T16:36:37+5:30
आता तर दुपारचे फक्त बाराच वाजलेत. लंच टाईमला अजून दीड तास अवकाश आहे आणि डोळ्यावरची झापड काही केल्या जात नाहीये. डोळ्यावर पाणी मारलं तरीही, जागेवरून उठून थोडं चालून आलं तरीही.
आता तर दुपारचे फक्त बाराच वाजलेत. लंच टाईमला अजून दीड तास अवकाश आहे आणि डोळ्यावरची झापड काही केल्या जात नाहीये. डोळ्यावर पाणी मारलं तरीही, जागेवरून उठून थोडं चालून आलं तरीही. दुपारी दोन वाजता महत्त्वाची मिटींगही अटेंड करायची आहे. अशात या डुलकीने मेंदूला पार झोपवून टाकलंय.. थोडी डुलकी घेतली तरी प्रत्येक वेळी ताजंतवानं वाटेलच असंही नसतं. नंतरही बरेचदा झाकोळून आल्यासारखं वाटत राहतं.
आॅफिसमध्ये आल्यानंतर काही वेळानं डोळ्यावर येणारी झापड वा डुलकी ही अनेकांना भेडसावणारी समस्या असते. कधीकधी तर ती दिवसभर छळत राहते. पाचच मिनिटं कुठं डोळे मिटून झोपता आलं तर.. ची स्वप्ने पाहण्यातच दिवस सरतो. बहुतेकजण अशावेळी चहा किंवा कॉफी घेतात. पण त्याने होतं उलटंच. झोप अधिकच तीव्र होत जाते. हा सगळा खेळ असतो मेंदूमधील रासायनिक क्रियांचा. जेव्हा डुलकीच्या अधीन असताना आपण चहा किंवा कॉफी घेतो तेव्हा ते लहान आतड्याकडून शोषून घेतलं जातं व नंतर रक्तवाहिन्यांमध्ये पोहचतं. काही वेळात ते तुमच्या मेंदूत पोहचून मेंदूतील अॅडेनोसिनने युक्त अशा रिसेप्टर्सला जाऊन धडकतं. हे अॅडेनोसिन एक प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर्स असतात जे तुम्हाला असं झोपाळूपणाचं फिलींग देत असतात. हे फिलिंग म्हणजे खरंतर एक प्रकारचं बायप्रॉडक्टंच असतं. जेव्हा तुम्ही कुठलंही एनर्जी ड्रिंक घेता तेव्हा ते या अॅडेनोसिनला घेरून घेतं. परिणामी तुम्हाला गळाल्यासारखं, थकल्यासारखं किंवा थोड्यावेळ तरी झोपावंसं वाटू लागतं. आठवा, गोड खाल्ल्यानंतर डोळ्यावर झापड येते नां?
आता यावरच्या उपायाकडे वळू. जेव्हा तुम्हाला डुलकी आल्यासारखं नुकतंच वाटू लागतं. एखादी डुलकी घेण्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजे २० मिनिटे आधी तुम्ही कॉफी घ्या. ही वेळ तुम्हाला तुमची शोधून काढता येऊ शकते. पहिली जांभई ही त्याची एक खूण असते. त्या वेळेच्या आधी कॉफी घेतल्याने तुम्ही एक प्रकारे तुमच्या मेंदूची फसगत करत असता. मेंदूतल्या झोपेच्या यंत्रणेला तुमच्या बाजूने काम करायला भाग पाडत असता. या आधीच घेतलेल्या कॉफीमुळे तुमच्या मेंदूला तरतरीत अवस्थेतच झोपेचे फिलिंग येते. ती झोप किंवा डुलकीची गरज पूर्ण होते जेव्हा तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी सज्ज व्हायचे असते. ही डुलकी अॅडोनोसिनला बाजूला सारते आणि तुमचा मेंदू पुन्हा तल्लख होतो.
अर्थात या कॉफी नॅप प्रयोगाची प्रक्रिया मेंदूत कसकशी घडते ते तिथे जाऊन पाहण्याचा कुठला मार्ग नाही. मात्र संशोधकांनी या कॉफी नॅपचा चांगला उपयोग होत असल्यावर एकमत नोंदवलं आहे.
ठरावीक वेळेला दुपारची डुलकी आणि नंतर चहा किंवा कॉफी असं समीकरण न ठेवता, आधी चहा किंवा कॉफी मग डुलकी असं करून बघा. कदाचित तुम्हालाही त्या आॅफिसात नकोशा वाटणाऱ्या डुलकी द्वंद्वातून सुटका करून घेता येईल. मग तुम्हालाही वाटेल, साध्या डुलकीपेक्षा कॉफी नॅप बरी.