दिवसातून किती कप कॉफी पिता? तीनपेक्षा जास्त कप पित असाल तर होऊ शकते गंभीर समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:38 PM2023-10-31T12:38:18+5:302023-10-31T12:39:40+5:30
Coffee Side Effect : मायग्रेन ही डोकेदुखीची एक गंभीर समस्या आहे. सामान्यपणे यात अर्ध डोकेदुखी होते आणि थांबून थांबून डोकं दुखतं.
Coffee Side Effect :सामान्यपणे असं मानलं जातं की, डोकेदुखी होत असेल तर कॉफीचं सेवन करायला हवं. पण एका रिसर्चमधून हे खोटं असल्याचं सांगण्यात आलं आहे. या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, कॉफीचं अधिक सेवन केल्याने मायग्रेनची समस्या होऊ शकते. अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, दिवसातून तीन कप किंवा त्यापेक्षा अधिक कॉफीचं सेवन केल्याने मायग्रेनचा धोका वाढू शकतो.
हॉर्वर्ड टी एच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एलिजाबेथ मोस्तोफस्की यांच्या टीमला आढळलं की, ज्या लोकांना कधी कधी मायग्रेनची तक्रार होते, त्यांना एकदा किंवा दोनदा कॅफीनयुक्त पेय पदार्थांचं सेवन केल्याने त्या दिवशी डोकेदुखी झाली नाही. पण त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तीन कप किंवा त्यापेक्षा अधिक कॉफीचं सेवन केल्यावर त्यांना दुसऱ्या दिवशी डोकेदुखी झाली.
मायग्रेनचं दुसरं कारण
मोस्तोफस्की म्हणाल्या की, पूर्ण झोप न घेण्यासोबतच इतरही कारणांमुळे मायग्रेनचा धोका वाढू शकतो. पण कॅफीनची भूमिका विशेष रूपाने अडचणीची आहे. कारण एकीकडे यामुळे डोकेदुखीचा धोका वाढतो, तर दुसरीकडे याने डोकेदुखी कमी करण्यासही मदत मिळते.
काय म्हणाले एक्सपर्ट?
एक्सपर्टनी सांगितलं की, तुम्हाला मायग्रेनचा त्रास झाल्यावर तुमच्याकडे कोणतंही औषध नसेल तर अशात कॉफीचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण कॉफीने तुम्हाला भविष्यात फार नुकसान होऊ शकतं. एक्सपर्ट सांगतात की, डोकेदुखी दूर करण्यासाठी कॉफी सेवन करण्याऐवजी नॅच्युरल थेरपीचा वापर करावा.
मायग्रेन म्हणजे काय?
मायग्रेन ही डोकेदुखीची एक गंभीर समस्या आहे. सामान्यपणे यात अर्ध डोकेदुखी होते आणि थांबून थांबून डोकं दुखतं. कधी कधी पूर्ण डोकंही दुखतं. हा त्रास 2 तासांपासून ते 72 तासांपर्यंत कायम राहतो. अनेकदा वेदना सुरू होण्याआधी रूग्णाला संकेतही मिळतात. ज्याद्वारे त्यांना वेदना होणार याची कल्पना आलेली असते.
या संकेतांना 'ऑरा' असं म्हटलं जातं. मायग्रेनला थ्रॉबिंग पेन इन हेडॅक असंही म्हटलं जातं. यात जणू डोक्यावर हातोडा मारल्यासारखी जाणीव होते. ही वेदना इतकी तीव्र असते की, व्यक्ती काही वेळासाठी काहीच करू शकत नाही. अनेकांमध्ये मायग्रेनची समस्या ही आनुवांशिक असते. तसेच ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक बघायला मिळते.