Health tips: बद्धकोष्ठतेचा त्रास वेळीच येईल आटोक्यात जर सेवन कराल 'या' बियांचे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:14 PM2022-06-15T16:14:54+5:302022-06-15T16:17:34+5:30

बद्धकोष्ठतेवर रामबाण ठरेल असा एक पदार्थ म्हणजे आळशीच्या बिया (Flax Seeds) अर्थात जवस. अत्यंत पौष्टिक असलेल्या जवसामुळे पोटाच्या तक्रारी कशा कमी होतील, हे जाणून घेऊ या.

constipation remedy flax seeds extremely beneficial | Health tips: बद्धकोष्ठतेचा त्रास वेळीच येईल आटोक्यात जर सेवन कराल 'या' बियांचे

Health tips: बद्धकोष्ठतेचा त्रास वेळीच येईल आटोक्यात जर सेवन कराल 'या' बियांचे

Next

कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास सध्या अनेकांना असतो. बदललेली जीवनशैली व व्यायामाचा अभाव हे त्याचं मूळ कारण आहे. दैनंदिन आयुष्यातून शारीरिक श्रम कमी झाले व मानसिक ताण वाढला आहे. पोषणमूल्यं असलेले पदार्थ आहारातून कमी झाले आहेत. काम व त्यासाठीची स्पर्धा वाढल्यानं, व्यायामासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. ही सगळी कारणं पोटाच्या तक्रारींमागे असतात. यातली महत्त्वाची तक्रार म्हणजे बद्धकोष्ठता. पोट साफ न झाल्यामुळे अनेकजण डॉक्टरांकडे औषधासाठी आग्रह धरतात; मात्र काही सोप्या उपायांकडे दुर्लक्ष करतात. बद्धकोष्ठतेवर रामबाण ठरेल असा एक पदार्थ म्हणजे आळशीच्या बिया (Flax Seeds) अर्थात जवस. अत्यंत पौष्टिक असलेल्या जवसामुळे पोटाच्या तक्रारी कशा कमी होतील, हे जाणून घेऊ या. याबाबत माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही हा त्रास होऊ शकतो व सध्याच्या काळात हा त्रास असणारे रुग्ण वाढतच आहेत. बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याचं मूळ कारण म्हणजे अन्नाचं पचन नीट न होणं. या गोष्टीकडे लक्ष दिल्यास बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका होऊ शकते. अन्नपचनासाठी जवस खूप उपयुक्त ठरतं. त्यातल्या तंतुमय पदार्थांमुळे (Fibre) अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. बद्धकोष्ठतेचा परिणाम म्हणून चेहऱ्यावर येणारी मुरमं, पुटकुळ्या यांवरही जवस फायदेशीर ठरतात. तसंच आतड्यांना येणारी सूज व आतड्यांचा दाह झाल्यामुळे उद्भवणारे आजार यांतून यातल्या ओमेगा-3 फॅटी (Omega-3 Fatty Acids) अ‍ॅसिड्समुळे मुक्ती मिळते.


जवसाचे आणखीही काही फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी या बिया खूपच फायदेशीर असतात. आयुर्वेदात आळशीच्या बियांचं महत्त्व सांगितलेलं आहे. शरीराच्या एखाद्या भागावर सूज आली असेल, तर याच्या तेलानं मालिश केल्यास ती सूज कमी होते. तसंच जवस खाल्ल्यानं कफाच्या समस्येपासून सुटका होते. आळशीच्या बिया किंवा जवस म्हणजे तपकिरी रंगाच्या छोट्या बिया असतात. जवसाच्या बिया नुसत्या चावूनही खाता येतात किंवा जेवण झाल्यावर पाचक म्हणून खाण्यासाठीही भाजलेल्या जवसाच्या बिया छान लागतात. जवसाची चटणीदेखील करता येते. जवसाची पूड करूनही विविध पद्धतींनी आहारात त्याचा वापर करता येतो. जवसातल्या अँटिऑक्सिडंट्समुळे (Antioxidants) त्वचा निरोगी राहते. जवसाच्या सेवनामुळं हॉर्मोन्स नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी जवसाचा आहारात नियमित समावेश केला पाहिजे. मधुमेहींसाठी व गर्भवती स्त्रियांसाठीही आळशीच्या बियांचे खूप फायदे आहेत. जवस पुरुषांसाठी तर फायदेशीर आहेच, पण स्त्रियांच्या अनेक आजारांवर ते खूपच गुणकारी ठरतं.

केवळ बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी नाही, तर सर्वसामान्यांनीही आपल्या घरात जवस कायम ठेवलं पाहिजे. कारण आरोग्यासाठी ते अतिशय फायदेशीर आहे.

Web Title: constipation remedy flax seeds extremely beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.