साथीचे आजार व गैरसमज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:02 AM2018-10-30T00:02:08+5:302018-10-30T00:02:43+5:30
पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात. मात्र, हाच पावसाळा सरला की उकाडा वाढतो, असह्य होतो.
- डॉ. गीता खरे
पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात. मात्र, हाच पावसाळा सरला की उकाडा वाढतो, असह्य होतो. मधूनच अवकाळी पावसाची एखादी सर बरसते आणि साथीचे विषाणूजन्य आजार आणि हिवताप आपले बस्तान बसवतात.
गेल्या काही वर्षांत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला म्हणा किंवा शास्त्रात प्रगती झाल्यामुळे डेंग्यू व इतर विषाणूजन्य आजारांचे अचूक निदान व रक्ताच्या तपासणीत बिंबिका मोजणे अधिक सोपे होऊ लागले म्हणा. त्यातच भरीसभर आपण रहिवाशांनी व प्रशासनाने, शहरीकरण व सुधारणांच्या नावाखाली निवासाच्या ठिकाणी केलेला चिखल, दलदल व पर्यावरणाचा नाश. या सगळ्या गोष्टींमुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या हल्ली वाढलेली दिसते.
घरात डेंग्यू, हिवताप व इतर संसर्गजन्य आजाराचे रुग्ण असतील तर त्यांची माहिती नगरपालिका प्रशासनाला कळवणे, आम्हा डॉक्टरांना जसे बंधनकारक असते, बहुतेक तसेच डेंग्यूच्या रुग्णांच्या हितचिंतक व नातेवाइकांना, आम्ही दिलेल्या औषधांखेरीज, बिंबिका (प्लेटलेट्स) वाढवणारे घरगुती इलाज करणेही तितकेच महत्त्वाचे असते.
या घरगुती उपायांमध्ये रुग्णांना पपई, किवीची फळे, पपईच्या झाडांची कोवळी पाने, बाजारात नव्याने शिरकाव करती झालेली लक्ष्मणफळे व मारुती फळे प्रमुख होत. आजाराची साथ व घरगुती उपायांच्या हव्यासापायी कित्येक पपईची झाडे, पाने व फळे तोडली गेल्यामुळे भकास होतात, कालांतराने खुंटतात वा जीवास मुकतात. अनेकदा या वाढत्या साथींबरोबर बाजारातील किवी फळांची किंमतही अकारण वाढते. बऱ्याचदा ती फळेच बाजारातून अदृश्य होतात. पपईच्या पानांच्या रसामुळे कित्येक रुग्णांना पोटातील आम्लता वाढल्यामुळे उलट्या होतात. बिंबिका कमी झाल्या असल्याने उलट्या होणे म्हणजे पोटातील अंतर्गत रक्तस्रावाला आमंत्रण देणे ठरते. तात्पर्य या आजारांवर अतिउत्साहाने कोणतेही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक आहे.
डेंग्यू व तत्सम आजारांच्या बाबतीत, साधारण अडीच ते तीन दिवस बराच ताप येतो, तो ताप उतरतोही. मात्र नंतर पांढºया रक्तपेशी व प्लेटलेट्स कमी व्हायला सुरुवात होते, अशक्तपणा येतो. आजारानंतरचा अशक्तपणा तर अतिशय तीव्र असतो. त्या थकव्यातून बाहेर येण्यास रुग्णांना एखादा आठवडा लागतो. पण ताप उतरला की रुग्णाची व त्यांच्या घरातील मंडळींना, त्यांचे दैनंदिन व्यवहार लवकरात लवकर चालू करण्याची घाई होते. नोकरीच्या ठिकाणी कामावर रुजू होणे तसेच मुलांना शाळेत पाठवणे याची लोकांना निकड वाटते. परंतु शाळेत वा कामाच्या ठिकाणी रुजू झाल्यावरही थकवा जाणवत असल्याने कित्येक जण घरी परत येतात. विषाणूजन्य साथीचे आजार व हिवताप गेल्यानंतरही घाई न करता घरी पुरेशी विश्रांती घेऊन नंतरच शाळेत अथवा नोकरीच्या ठिकाणी रुजू होणे योग्य ठरेल.
डासांमुळे होणारे आजार साथीचे असले तरी एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीला संसर्ग करत नाहीत. हे आजार पसरण्यासाठी डासांची गरज असते. पण वरील गैरसमजामुळे या रुग्णांना अकारण वेगळे ठेवले जाते.
साथीच्या व हवामान बदलामुळे होणाºया श्वसनविकारांत हवेतील प्रदूषणाचा मोठा वाटा असतो. आपण पाणी उकळवून व गाळून निर्जंतुक करू शकतो. मात्र तशी खिडक्यादारे लावून व धुळीचा बंदोबस्त करून, हवा निर्जंतुक करता येत नाही. परिणामी, परिसरातील प्रदूषण सर्व प्रतिबंधक उपाय करूनही आपल्याला त्रास देतेच. त्यामुळे व्यक्तिगत स्वच्छतेसोबत, परिसर स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. खाद्यपदार्थांतून होणाºया आजारांच्या बाबतीत, लोकांचा गैरसमज असा की, शीतकपाटातील बर्फात ठेवलेले पदार्थ निर्जंतुक राहतात आणि ते पदार्थ उकळल्यावर किंवा गरम केल्यावर खाण्यायोग्य निर्जंतुक होतात. या गैरसमजापोटी पादूषित पदार्थ खाल्ले व प्यायले जातात आणि हेच आजारांना आमंत्रण ठरते. आजारांच्याबाबत असलेल्या समज व गैरसमजाबद्दल डॉक्टर वा अधिकृत माहितीच्या स्त्रोताद्वारे (सोशल मिडिया नव्हे) आपल्या शंकांचे निरसन करावे.