सतत मोबाइल वापरायची सवय लागली आहे? मग नोमोफोबियाबद्दल नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 08:00 AM2018-05-18T08:00:00+5:302018-05-18T08:00:00+5:30

सारखं मोबाइलमध्ये पाहाण्याचं व्यसन तुम्हाला आहे का? मोबाइलच्या व्यसनापासून तुम्हाला स्वतःची सुटका करुन घ्यायची असेल तर हे वाचा...

Continued use of mobile phones? Then read exactly about nomophobia | सतत मोबाइल वापरायची सवय लागली आहे? मग नोमोफोबियाबद्दल नक्की वाचा

सतत मोबाइल वापरायची सवय लागली आहे? मग नोमोफोबियाबद्दल नक्की वाचा

Next
ठळक मुद्देतुमच्या फोनची बॅटरी थोडी जरी कमी झाली किंवा बॅटरी पूर्ण संपायला आली की तुम्ही अस्वस्थ होता का किंवा फोन हरवला आहे अशी कल्पना तुम्हाला अस्वस्थ करते का ?तुमचा मोबाइल जराही नजरेआड झालेला तुम्हाला चालत नाही का?

मुंबई- मोबाइल पाहिल्याशिवाय आजकाल कोणाचा सलग तासभरही जात नाही. लहान मुलेही मोबाइलपासून थोडाही काळ दूर जाण्यास नकार देतात. ट्रेनमध्ये, बसमध्ये आत शिरल्यावर सगळे लोक हातात फोन घेतात आणि गर्दीत धक्के खातही फोनवर चॅटिंग करत राहातात. त्यामुळे पुढील काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतःला विचारली पाहिजेत.

दर सेकंदाला फोन वाजल्यावर तुम्ही तुमचा फोन चेक करता का? बऱ्याचवेळेस फोन वाजला नाही तरी तुम्ही मोबाइलकडे पाहात बसता का?, मोबाइलमधला दिवा जरासाही पेटला की तुम्ही लगेच तो हातात घेता का?, तुमच्या फोनची बॅटरी थोडी जरी कमी झाली किंवा बॅटरी पूर्ण संपायला आली की तुम्ही अस्वस्थ होता का किंवा फोन हरवला आहे अशी कल्पना तुम्हाला अस्वस्थ करते का ?तुमचा मोबाइल जराही नजरेआड झालेला तुम्हाला चालत नाही का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर हो असली तर नक्कीच ही काळजीची बाब आहे. कारण ही सगळी नोमोफोबिया या आजाराकडे वाटचाल होत असल्याची लक्षणे आहेत. नोमोफोबिया म्हणजे नो मोबाइल फोन फोबिया. आपला फोन नाहिसा झाला, तो तुटला किंवा त्याची बॅटरी संपली तर काय होईल? असे वाटून येणारी अस्वस्थता यामध्ये रुग्णाला सारखी त्रास देत असते. मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे वाढलेल्या ताणतणावात्मक आजारांनी तरुणांना घेरण्यास सुरुवात केली आहे. ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एम्स)च्या न्युरॉलॉजी विभागाने केलेल्या अभ्यासातून मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमरची शक्यता १.३३ पटीने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, इमेल असं एकापाठोपाठ चेक करत बसायचं मग इन्स्टाग्राम, ट्वीटर पाहायचे ते संपलं की आणखी काही अ‍ॅप उघडून बसायचं तेवढ्यात कोणीतरी तुम्हाला पिंग करतं, त्याच्याशी चॅट करत बसायचं मध्येच फेसबूकवर आपल्या फोटोवर कोणी कमेंट केली ते पाहायचं हे सुरु असताना गाणी ऐकायची आणि रात्री यूट्यूबवर काहीतरी पाहात झोपी जायचं अशी काहीशी जीवनशैली तरुणाईची तयार झाली आहे. माझ्या फेसबुक वॉलवर मित्राने काही कमेंट केली असेल तिला मी लाइक केलं नाही किंवा त्याला उत्तर दिलं नाही तर अनर्थ होईल अशी नाहक भीती सगळ्यांना त्रास देत राहते. इतकेच नव्हे तर अजून कसं कोणी माझ्या फोटोवर, स्टेटसवर रिअ‍ॅक्ट झालं नाही असा प्रश्न तरुणांना सतावतो आणि मग ते अक्षरश: प्रत्येक सेकंदाला फोन उघडून बसतात. यामुळे फोन त्यांच्या आ़युष्याचा अविभाज्य अंग बनतो आणि त्यामुळेच फोनचे नसणे किंवा फोन नाही ही कल्पनाही त्यांना अस्वस्थ करते. 

नोमोफोबिया ही संज्ञा सर्वात प्रथम २०१० साली इंग्लंडमधील एका संशोधन संस्थेने तयार केली. त्यांनी केलेल्या अभ्यासाअंती इंग्लंडमधील ५३ टक्के लोकांना आपला फोन हरवला किंवा बॅटरी संपू लागली की अशी अस्वस्थता जाणवत होती. ५८ टक्के पुरुष आणि ४७ टक्के महिलांना या अस्वस्थतेने घेरलेले होते. त्यांच्या आणखी एका अभ्यासामध्ये ५४७ विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के मुलांना नोमोफोबिया होता तर ६४ टक्के मुलांमध्ये नोमोफोबिया होईल अशी भीती दिसून येत होती. या मुलांपैकी ७७ टक्के मुले एका दिवसात ३५ किंवा त्याहून अधिकवेळेस फोन तपासत होते. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार सर्वेक्षण केलेल्या १००० लोकांपैकी ६६ टक्के लोकांना फोन हरवण्याची काळजी वाटत होती.१८ ते २४ वयोगटातील मुलांपैकी ७७ टक्के लोकांना मोबाइलपासून काही मिनिटेदेखिल लांब राहणे असह्य आणि अशक्य वाटत होते. तसेच साधारणपणे ही मुले दिवसभरामध्ये ३४ वेळा फोन चेक करुन पाहात होती तर ७५ टक्के मुले बाथरुममध्येही फोन घेऊन जात होती.

नोमोफोबिया कसा ओळखावा ?
१) फोनच्या वापरामुळे तुमचा बहुमुल्य वेळ वाया जाऊ लागतो.

२)तुमच्या वागण्या-बोल्यामध्ये अस्वस्थता येऊ लागते. इंग्लंडमधील एका सर्वेक्षणानुसार ५१ टक्के लोकांना एक्स्ट्रीम टेक अ‍ॅन्झायटी म्हणजे स्मार्टफोनपासून दूर झाल्यास येणारी अस्वस्थता होती.

३) फोनच्या अतिरेकी वापरामुळे तुमची झोप बिघडते, तुम्हाला झोप कमी येते किंवा सतत झोपमोड होते.

नोमोफोबिया कमी करण्यासाठी काय कराल?
१) झोपण्यापुर्वी एक तासभर आदी तरी तुमचा फोन वापरणे बंद करा. व्हायब्रेशन्स, ब्लिंक होणारे लाइटस आणि आवाज तुम्हाला झोप येऊ देत नाही. आता दिवसभराचे काम संपले आहे याची जाणिव मेंदूला होण्यासाठी फोन बंद करणे गरजेचे आहे अन्यथा मेंदूला विश्रांतीची संधीच मिळणार नाही.

२) गरज नसेल तर रात्रभर फोन बंद करणे कधीही चांगलेच. फोन बंद केला आणि काहीतरी चांगले-वाईट जगात घडेल व ते आपल्याला समजणार नाही ही भीती नाहक आहे. कोणतीही बातमी पोहचण्यात आता अडथळा येत नाही. प्रत्येक मेसेजला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. किंवा तुमच्या मित्रांच्या फेसबूक किंवा टष्ट्वीटरवर आपण रिअ‍ॅक्ट झालो नाही तर आकाश कोसळेल अशी भीती मनातून काढून टाका. मोबाइल फोन नसताना आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी उदाहरणार्थ फिरायला जाण्यास, खेळायला, व्यायामाला, जेवायला, वाचायला मिळणारा वेळ आठवून पाहा.

३) फोन पाहण्याच्या वेळा ठरवून ठेवा. आता मी तासभर वाचन करणार आहे किंवा तासाभरानंतरच फोनला हात लावेन असा निर्णय घ्या. तसेच पाचच मिनिटे फोन पाहेन असं ठरवून मगच फोनला हात लावा

४) घरातील काही भागांमध्ये फोन वापरणार नाही असा निश्चय करा. वाचण्याची जागा, स्वयंपाकघर, बाथरुम, टॉयलेट येथे फोन वापरायचा नाही. लहान मुलांपासून फोन दूर ठेवा

५) नवे छंद किंवा नवी आवड जोपासण्याचा प्रयत्न करा. वाचन, बागकाम, घरकाम तुम्हाला फोनपासून दूर ठेवेल. घरातील लोकांशी, मित्रांशी, शेजाऱ्यांशी स्वत: तेथे जाऊन बोला, तेथे चॅटिंगचा वापर टाळा.

6) आजकाल लहान मुलेही आई-वडिलांच्या हातातला मोबाइल घेऊन गेम खेळायला लागतात. जर पालकांनीच मोबाइलचा अतिवापर केला तर मुलांनाही मोबाइलचे व्यसन लागेल. त्यामुळे शक्य तितका मोबाइलचा वापर कमी करणे आवश्यक आहे.

Web Title: Continued use of mobile phones? Then read exactly about nomophobia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.