कंट्रोल न होणा-या रागाला असे करा कंट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 11:40 AM2018-04-11T11:40:12+5:302018-04-11T11:40:12+5:30
आज आपण आपल्या रागाला ओळखण्याचे संकेत आणि त्यापासून सुटका कशी मिळवता येईल याविषयी जाणून घेऊया.
ट्रॅफिकमधून तुम्हाला कुणी कट मारला तर राग येतो का? तुमची लहान मुलं तुमचं ऐकत नसतील तर राग येतो का? राग हा मानवी स्वभावाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. पण यासोबत सकारात्मकपणे डील करणे फायद्याचे ठरेल. कंट्रोल न होणारा राग हा तुमच्या आरोग्यासाठी आणि रिलेशनशिपसाठीही धोक्याचा आहे. आज आपण आपल्या रागाला ओळखण्याचे संकेत आणि त्यापासून सुटका कशी मिळवता येईल याविषयी जाणून घेऊया.
रागाला ओळखण्याचे संकेत
जीवन केवळ सुखाचे नाव नाही, यामध्ये सुखासोबत संकटेसुद्धा येत-जात राहतात. अशावेळी कठिण परिस्थितीचा बाऊ करण्यामध्ये शहाणपण नाही. रागाचे काही स्पष्ट संकेत असतात, ज्यावरुन कळतं की, तुम्ही रागात आहात.
धैर्याची कमतरता
शिव्या देणे
समोरच्यास कमी लेखने
चिडचिड करणे
प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला दोषी ठरविणे
राग आल्यावर काम बंद करणे किंवा मागे हटून जाणे
लोकांचे तुमच्यापासून दूर जाणे
पत्नी, मुले आणि नातेवाइकांचे तुमच्याशी भीतीने बोलणे
हे तुम्ही रागीट असण्याचे काही संकेत आहेत. आपल्या आजूबाजूचे लोक, मित्र, नातेवाईक किंवा स्वतःमध्येही या प्रकारची लक्षणं असू शकतात. परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची लाज बाळगायला नको. या समस्येचे समाधान शोधायला पाहिजे. आता प्रश्न हा आहे की रागावर कसे नियंत्रण करावे त्यासाठी पुढील उपाय आहेत.
10 पर्यंत नंबर मोजा
जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही रागात आहात, तेव्हा सर्वात आधी काहीही प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत व्हा आणि लांब श्वास घ्या, यामुळे आपल्याला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत होईल. आणि मनातल्या मनात 1 ते 10 पर्यंत नंबर मोजा. यामुळे आपल्याला विचार करायला आणि समजायला थोड़ा वेळ मिळेल. हे जरा तुम्हाला फिल्मी वाटेल पण याचा फायदा होतो.
एक ब्रेक घ्या
जर तुम्हाला वाटतं की, तुम्हाला खूप जास्त राग येतो. तर अशावेळी आपण कोणत्याही वादात पडू नये. कारण आपण आपला कंट्रोल हरवण्याची भीती असते. त्यामुळे बरं हेच होईल की, तुम्ही त्या जागेवरून दूर जावं. त्यासाठी एक छोटा ब्रेक घ्या. थंड पाणी प्या आणि थोडे फार चालू लागा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही आणि दूसरा व्यक्ति शांत होईल, तेव्हा आपली चर्चा पुन्हा सुरु करू शकता.
रागाचे कारण ओळखा
रागासोबत डील करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे की, रागाचं कारण शोधा. परिस्थिती आणि कारणांना व्यवस्थित समजून घ्यावे, त्यापासून झालेल्या त्रासाला दूर करावे.
चांगली झोप घ्या
कधी कधी कामाच्या लोडमुळे व्यवस्थित झोप येत नाही. ज्यामुळे डोकेदुखी, तणाव आणि चिडचिड होते. यातून विनाकारण दुस-यांवर राग निघतो. अशात काहीही झाले तरी, तुम्ही कितीही बिझी असाल तरी निदान 7 तासांची झोप घ्या.
मोकळे व्हा
अनेकदा दुस-यांचा विचार करुन काही लोक आपल्या मनातील गोष्टी तशात दाबून ठेवतात. त्यांना जे वाटतं ते दुस-यांना सांगत नाहीत. त्यामुळे राग येण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी तुमच्या मनात काय आहे ते बोलून टाका. यामुळे तुमच्या मनात काही दडून राहणार नाही आणि तुमची चिडचिड कमी होईल.