कोरोनाचा आठ महिने शरीरात मुक्काम; रुग्णांनी आरोग्याबाबत राहावे सतर्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 07:42 AM2023-01-05T07:42:08+5:302023-01-05T07:42:25+5:30
कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग हवेतून तसेच फुफ्फुसांच्या वाटेने अधिक प्रमाणात होतो, असे संशोधनात म्हटले आहे.
वॉशिंग्टन : कोरोनाचा सार्स कोव्ह २ हा विषाणू माणसाच्या मेंदूपासून शरीरातील इतर अवयवांमध्येही पसरतो. तिथे त्याचे अस्तित्व सुमारे आठ महिन्यांपर्यंत राहते. कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या उतींच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले आहे.
कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग हवेतून तसेच फुफ्फुसांच्या वाटेने अधिक प्रमाणात होतो, असे संशोधनात म्हटले आहे. 'नेचर'मध्ये याबाबत अहवाल प्रसिद्ध झाला आहे. कोरोना रुग्णांच्या शरीरातील ८४ टक्के अवयवांमध्ये सार्स कोव्ह २ विषाणूचे अस्तित्व आढळून आले, असे संशोधकांनी म्हटले आहे.
बालके कोरोना लसीमुळे सुरक्षित
■ बालकांना मल्टिसिस्टिम इनफ्लेमेटरी सिंड्रोमचा (एमआयएस-सी) त्रास झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस घेणे सुरक्षित आहे, असे एका संशोधनातून आढळून आले. कोरोना संसर्ग निवळल्यानंतर मुलाच्या शरीरात प्रतिपिंडे विकसित होतात. त्यामुळे मुलाच्या शरीरातील अवयवांना अॅलर्जीचा त्रास जाणवू शकतो.
■ त्याला एमआयएस सी म्हणतात. त्याचा त्रास पुन्हा जाणवला तरी त्यामुळे प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्याचे उदाहरण अद्याप समोर आलेले नाही. या संशोधनात सहभागी झालेल्या रुग्णांपैकी काही जणांना हात दुखणे, थोड्या प्रमाणात थकवा, अशी सौम्य लक्षणे जाणवली.
नोझल स्टॅब चाचणी अधिक प्रभावी
सध्या प्रचलित असलेल्या चाचण्यांतून ज्यांचा शोध लागत नाही, अशा विषाणूंचे अस्तित्व नोझल स्टॅब चाचणीद्वारे ओळखता येऊ शकते, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. लॅन्सेट मायक्रोब जर्नलमध्ये या संशोधनावर आधारित लेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोना आजाराचे नवे विषाणू त्यांचा शोध लागण्यापूर्वीच जगभरात पसरलेले असतात.