कोरोनाचा उपप्रकार डेंजर, सतर्क राहा, तज्ज्ञांचे मत; लसीकरणामुळे दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 10:04 AM2023-01-01T10:04:46+5:302023-01-01T10:05:20+5:30
Corona : राज्य कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, नवा उपप्रकार देशासाठी किती घातक आहे, हे आताच सांगणे अवघड आहे.
मुंबई : कोरोनाचा कोणताही नवीन उपप्रकार सापडलेला नाही. त्यामुळे काळजी नसावी, असे मत आतापर्यंत आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ व्यक्त करत होते. मात्र नवीन वर्ष सुरू व्हायला काही तास बाकी असताना धोकादायक ‘एक्सबीबी. १.५’ हा ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार आढळून आला. गुजरातमध्ये या उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
राज्य कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, नवा उपप्रकार देशासाठी किती घातक आहे, हे आताच सांगणे अवघड आहे. कारण आपल्या देशात सध्याच्या घडीला ‘एक्सबीबी. १.५’ उपप्रकाराचा एकच रुग्ण आढळला आहे. अमेरिकेत या उपप्रकाराचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराशी लढण्यासाठी आवश्यक असणारी अँटीबॉडीज आहेत. खबरदारी घेणे आवश्यक असून, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा.
केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, दरवेळी मार्चमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढते. त्यामुळे यंदाही संसर्ग होईल. रुग्णसंख्याही वाढेल. मात्र आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाहीत.
आम्ही विषाणूच्या जेनेटिक फूटप्रिंट्सवर नजर ठेवून आहोत. राज्य १०० टक्के जिनोमिक सिक्वेन्सिंग करीत आहे. महाराष्ट्रात एक्सबीबी उपप्रकाराचा २७५ जणांना संसर्ग झाला होता. मात्र, एक्सबीबी १.५ हा उपप्रकार वेगळा असून, त्याची फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. एक्सबीबी परिवारातील असल्यामुळे त्याचा किरकोळ परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. प्रदीप आवटे, सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग.