Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मिळतं 'सुरक्षा कवच'?; जाणून घ्या महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 08:29 AM2021-06-19T08:29:45+5:302021-06-19T08:32:33+5:30
कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची माहिती; इंग्लंडमध्ये महत्त्वपूर्ण संधोशन
लंडन: भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र अनेकांच्या मनात कोरोना प्रतिबंधात्मक लसीबद्दल अनेक गैरसमज आहेत. कोरोनाची लस घेतली तरीही कोरोनाची लागण होऊ शकते. मग कशासाठी लस घ्यायची, असे प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या कमी नाही. यासोबतच कोरोनाची लस घेतल्यावर आपल्याला आता कोरोना होणारच नाही म्हणून बेदरकापणे वागणाऱ्यांचं प्रमाणदेखील कमी नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर लगेच शरीरात अँटीबॉडीज तयार होत नाहीत. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.
कोरोनाची लस घेतल्यावर २ ते ३ दिवसांत शरीरात अँटिबॉडीज तयार होतात, असा अनेकांचा समज आहे. मात्र प्रत्यक्षात कोरोनाची लस घेतल्यानंतर २१ दिवसांनंतर तुमचं शरीर विषाणूपासून होणाऱ्या संक्रमणापासून स्वत:ला वाचवण्याची क्षमता विकसित करतं. या २१ दिवसांत बेजबाबदारपणे वागल्यास कोरोनाची लागण होऊ शकते. इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा धोका किती कमी होतो, दुसरा डोस घेतल्यानंतर काय होतं, अशा प्रश्नांची उत्तरं संशोधनातून मिळाली आहेत.
इंग्लंडस्थित युके ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २१ दिवसांनी तुम्ही सुरक्षित होता. लस घेतल्यानंतर ३ आठवड्यांनी तुमच्या शरीरात कोरोना विषाणूचा सामना करू शकणाऱ्या पुरेशा अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र त्यामुळे होणारा त्रास कमी असतो. तुमची प्रकृती गंभीर होणार नाही. तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही.
ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्सनं दिलेल्या माहितीनुसार, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर १६ दिवस कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. मात्र त्यानंतर आठवड्याभरानं हा धोका वेगानं कमी होतो. एक महिन्यानंतर तर लागण होण्याचा धोका अतिशय कमी असतो. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण ०.१ टक्के आहे. मात्र यातील बहुतांश लोकांना दुसरा डोस घेण्याआधीच कोरोनाची लागण झाली होती. तर काही व्यक्ती लसीकरण केंद्रावर कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्या.