Corona Vaccination: कोरोना लस घेतली अन् साईड इफेक्ट्स दिसलेच नाही, तर काय समजायचं?; तज्ज्ञ म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:25 PM2021-04-25T12:25:44+5:302021-04-25T12:55:31+5:30
Corona Vaccination: कोरोनाची लस घेतल्यावर साईड इफेक्ट्स दिसू लागतात. ताप, अशक्तपणा येतो. पण कोणतेच साईड इफेक्ट्स न दिसल्यास त्याचा अर्थ काय होतो..?
मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळून आले. यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत हा आकडा तब्बल साडे तीन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रेमडेसिविरशिवाय ५००० जणांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जाणून घ्या उपचार पद्धत
कोरोना लसीकरणाबद्दल नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. लस घेतल्यावर एक-दोन त्रास होतो. अशक्तपणा जाणवतो. ताप येतो असं म्हटलं जातं. अनेकांच्या कुटुंबीयांनी त्याचा अनुभव घेतला आहे. त्रास झाला याचा अर्थ लस लागू पडतेय, असं म्हटलं जातं. पण कोणताही त्रास झालाच नाही तर काय, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाला जामखेडमध्ये ५ हजार कोरोना रुग्णांना बरं करणाऱ्या डॉ. रवी आरोळेंनी उत्तर दिलं.
ना रेमडेसिविर, ना महागडी औषधे; तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे!
लस घेतल्यावर कोणताही त्रास झाला नाही, काहीच साईड इफेक्ट्स दिसले नाहीत, तरीही ती लागू झाली असं आपल्याला गृहित धरावं लागेल. कारण देशात सध्या वापरात असलेल्या दोन्ही लसींच्या चाचण्यांचे निष्कर्ष अतिशय उत्तम आहेत. कोविशील्ड असो वा कोवॅक्सिन असो, दोन्ही लस अत्यंत प्रभावी आहेत. त्यामुळे शंका घेण्याचं कारण नाही. लोकांनी निश्चिंतपणे लस घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास किती दिवसांत कोरोना होतो, चाचणी कधी करावी, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. या प्रश्नालाही डॉ. आरोळेंनी उत्तर दिलं. 'कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर तिसऱ्या ते पाचव्या दिवसापर्यंत लक्षणं दिसू शकतात. विषाणू शरीरात शिरल्यानंतर त्याची लक्षणं दिसण्यासाठी ४८ ते ७२ तास लागतात. आज तुम्ही संपर्कात आलात आणि उद्या लागण झाली असं होत नाही. त्यामुळे संपर्कात आले असल्यास तीन दिवसांनी चाचणी करावी. चाचणी लगेच केल्यास विषाणू आढळून येणार नाही', अशी माहिती आरोळेंनी दिली.