Corona Vaccine : कोरोना विरोधात गेम चेंजर ठरू शकते ही नेजल व्हॅक्सीन, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:52 AM2022-01-31T11:52:07+5:302022-01-31T11:53:06+5:30
या लसीची चाचणी 9 वेगवेगळ्या ठिकाणी होईल. महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला DCGI च्या विषय तज्ज्ञ समिती (SEC)ने भारत बायोटेकला आपल्या इंट्रानेजल लसीच्या (BBV154) ट्रायलसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली - भारत बायोटेकची नेजल लस कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत गेम चेंजर ठरू शकते. हैदराबाद येथील या औषध निर्माता कंपनीला बूस्टर डोससाठी इंट्रानेजल कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी मान्यता मिळाली आहे. दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)चे वरिष्ठ महामारी तज्ज्ञ डॉ. संजय राय (Dr Sanjay Rai) यांनी म्हटले आहे, की जर क्लिनिकल ट्रायलमध्ये या लसीने म्यूकोसल इम्युनिटी दिली तर हे एक मोठे यश असेल. अशात ही लस महामारी विरोधातील लढाईत एक गेम-चेंजर सिद्ध होऊ शकते.
33 लसी, पण कोणतीच प्रभावी नाही -
AIIMS मधील वरिष्ठ महामारी तज्ज्ञ डॉ. संजय राय (Dr Sanjay Rai) यांनी ANI सोबत बोलताना सांगितले, की या लसीने म्यूकोसल इम्यूनिटी दिली, तर ही मानव जातीसाठी एक मोठे यश असेल. जगभरात जवळपास 33 लसी आहेत. मात्र, संक्रमण रोखण्यात कुठलीही लस हवी तेवढी प्रभावी नाही. आम्हाला आशा आहे, की ही लस म्यूकोसल इम्युनिटी प्रदान करेल. जेणे करून महामारीला आळा घालता येईल.
Budget पासून व्यक्त केली अशी आशा -
सरकारकडून सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय स्तरावरील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासंबंधी घोषणा असायला हव्यात, कारण हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच ही शेवटची महामारी नाही. भविष्यातील महामारीसाठी आपण तयार असायला हवे. एवढेच नाही, तर येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणाही बळकट करणे आवश्यक आहे, असेही राय म्हणाले.
9 ठिकाणी करण्यात येणार ट्रायल -
या लसीची चाचणी 9 वेगवेगळ्या ठिकाणी होईल. महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला DCGI च्या विषय तज्ज्ञ समिती (SEC)ने भारत बायोटेकला आपल्या इंट्रानेजल लसीच्या (BBV154) ट्रायलसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे.