Corona Vaccine:कोरोना रुग्णांना लस का देत नाही? दोन डोस वेगवेगळ्या कंपनीचे घेऊ शकतो का? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:14 PM2021-05-13T18:14:36+5:302021-05-13T18:23:29+5:30
जाणून घेऊया कोरोनाबाधितांना लस घेण्यासाठी का नकार दिला जातो? जगभरातील तज्त्र दोन डोसमधील अंतर ठेवण्याचा सल्ला अखेर का देतात?
नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक जण संक्रमित होत आहे. यात कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. कोरोना रुग्णांना लस कधी दिली पाहिजे यावर सध्या संशोधन सुरू आहे. भारतात लसीकरणावरून राष्ट्रीय सल्लागार समुहाने लस लावण्यावरून अनेक शिफारशी केल्या आहेत. यात कोविशिल्डच्या २ डोस मधील अंतर वाढवून ते १२-१६ आठवडे करण्याची शिफारस केली आहे. त्याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह झालेल्यांनी बरे झाल्यानंतर ६ महिन्यानंतर लस द्यावी. परंतु कोव्हॅक्सिनमध्ये कोणत्याही बदलाची शिफारस केली नाही.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI)ने सर्वात पहिलं कोविशिल्ड पहिला आणि दुसरा डोस घेण्यामध्ये ४-६ आठवड्याचं अंतर तर कोव्हॅक्सिनमध्ये पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेण्याची परवानगी आहे. काही दिवसांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी ४-८ आठवड्याचं अंतर आणि कोव्हॅक्सिनसाठी ४-६ आठवड्याचं अंतर वाढवण्यात आलं. एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दुसरा डोस पहिल्या डोसनंतर ६-८ आठवड्यात घ्यावा असं सांगितलं.
जाणून घेऊया कोरोनाबाधितांना लस घेण्यासाठी का नकार दिला जातो? जगभरातील तज्त्र दोन डोसमधील अंतर ठेवण्याचा सल्ला अखेर का देतात? अमेरिकेचे CDC नुसार जर कोणी लसीचा एकही डोस घेतला नसेल आणि तो कोरोना संक्रमित झाला तर लक्षणं दिसल्यानंतर कमीत कमी ९० दिवस वाट पाहावी लागेल. तर वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग म्हणतात की, UK डेटानुसार SARS COV2 इंफेक्शनमुळे तयार झालेली अँन्टिबॉडी ८० टक्के सुरक्षा देते. त्यामुळे संक्रमित झाल्यानंतर लस घेईपर्यंत ६ महिन्याची वाट पाहणं योग्य राहणार आहे.
आकडेवारी पाहिली तर जागतिक आरोग्य संघटनेनेही हाच सल्ला दिला आहे. WHO म्हणतं, नॅच्युरल इंफेक्शनंतर लस घेण्यासाठी ६ महिने थांबले पाहिजे. कारण कोरोनामुळे निर्माण झालेली अँन्टिबॉडी शरीरात इतके दिवस बनून राहते. कर्नाटकात SARS_COV2 जेनेटिक कंफर्मेशनच्या नोडेल अधिकारी डॉ. वी. रवी यांनी सांगितले की, कोरोना लक्षण दिसल्यानंतर ८ आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जाऊ शकतो.
संक्रमित लोकांमध्ये अँन्टिबॉडी तयार होते जी लस घेतल्यानंतर मिळणाऱ्या अँन्टिबॉडी इतकीच असते. जर एखाद्याला कोरोना झाला असेल तर त्याचं शरीर रोगाविरोधात अँन्टिबॉडी निर्माण करतं. अशावेळी जर लस घेतली तर त्याची रोगप्रतिकार शक्ती प्रभावीपणे सक्रीय होत नाही. आरोग्य तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, दुसरा डोस लावण्यासाठी कमीत कमी ८ आठवड्यांची वाट पाहण्याचा सल्ला देतात. दोन डोस दरम्यान संक्रमित झाल्यास डोस कधी द्यायचा हे तुम्ही कधी कोरोनाबाधित झालात त्यावर आधारित आहे. सर्वसामान्यपणे लस घेतल्यानंतर शरीरात अँन्टिबॉडी तयार होण्यासाठी २ आठवड्यांचा कालावधी लागतो त्यामुळे या काळात संक्रमण होणार नाही हे सांगता येणार नाही असं तज्ज्ञ सांगतात.
त्याचसोबत जर तुम्हाला याआधी कोरोना झालेला नाही. तुम्ही लसीचा पहिला डोसही घेतला आहे. परंतु दुसरा डोस मिळत नाही. तरीही चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील कोविड १९ टास्क फोर्सचे शशांक जोशी म्हणतात की, दुसरा डोस घेण्यास विलंब झाला तरी घाबरू नका परंतु जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा तातडीने लावून घ्या. जगभरात जितक्या लसी बनल्यात त्यावर सध्या रिसर्च सुरू आहे. द लेसेंटमध्ये छापलेल्या रिपोर्टमध्ये कोविशिल्डच्या २ डोसमध्ये १२ आठवड्यांचे अंतर ठेवल्याने त्याचा परिणाम ८१.३ टक्के राहतो. तर ६ आठवड्यापेक्षा कमी अंतर ठेवले तर परिणाम केवळ ५५ टक्के राहतो. त्यामुळे कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर जास्त असेल तितकचं त्याचा परिणाम चांगला असेल असं प्रोफेसर रवीने सांगितले आहे.
अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे की, पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतला त्यानंतर तो डोस न मिळाल्यास कोविशिल्डचा डोस घेऊ शकतो का? त्यावर तज्त्र सांगतात २ विविध लसी घेतल्याचा सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही. तर CDC नुसार कोविड १९ च्या डोसमध्ये मिश्रण करू नका जर तुम्हाला एका लसीचा दुसरा डोस मिळत नसेल तर दोन्ही डोसमधील अंतर वाढवा परंतु विविध कंपन्यांचा डोस घेऊ नका. एकाच कंपनीचा डोस घ्या.