CoronaVaccine: भारतातील व्हॅक्सिनेशनमध्ये कंडोम तयार करणारी कंपनी बजावणार महत्वाची भूमिका, देण्यात आली मोठी जबाबदारी
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 12, 2021 10:14 PM2021-01-12T22:14:00+5:302021-01-12T22:14:26+5:30
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया सरकारला 4.5 कोटी लशी देणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात 1.10 कोटी डोस सप्लाय केले जातील. तर भारत बायोटेककडून पुढील काही महिन्यांत 55 लाख लशीचे डोस देण्यात येतील.
नवी दिल्ली -केंद्र सरकारने दोन कंपन्यांसोबत कोरोना लशीसंदर्भात करार केला आहे. लशींच्या डोस बरोबरच त्यांची किंमतही निश्चित करण्यात आली आहे. सरकारने, भारत बायोटेक (कोव्हॅक्सीन) आणि सीरम इंस्टिट्यूट-ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकासोबत (कोविशील्ड) करार केला आहे. सरकारने 11 जानेवारीला भारत बायोटेकसोबत 55 लाख डोससाठी करार केला आहे.
न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया सरकारला 4.5 कोटी लशी देणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात 1.10 कोटी डोस सप्लाय केले जातील. तर भारत बायोटेककडून पुढील काही महिन्यांत 55 लाख लशीचे डोस देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात एकूण 38.5 लाख तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 16.5 लाख लशी दिल्या जातील. यानंतर भारत बायोटेककडून आणखी 45 लाख डोस दिले जातील. सरकारने काही दिवसांपूर्वीच कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या इमरजन्सी वापराला मंजुरी दिली आहे. 16 जानेवारीपासूनदेशभरात लसिकरणाला सुरुवात होणार आहे.
कंपन्यांकडे मोफत लशीची मागणी -
सरकारने सीरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटेककडे काही मोफत लशींची मागणी केली आहे. भारत बायोटेकसोबत मोफत डोससंदर्भात चर्चा पूर्ण झाली आहे. तर सीरम इंस्टिट्यूटसोबत सध्या चर्चा सुरू आहे. कोविशील्डच्या एका डोसची किंमत 220 रुपये एवढी आहे. तर कोव्हॅक्सीनची किंमत टॅक्ससह 309 रुपये 50 पैसे एढी आहे. कोव्हॅक्सीनचा एकच डोस घ्यावा लागणार आहे, त्यामुळे हिची किंमत अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यांना पहिल्या टप्प्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. हा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे आणि हे पैसे पीएम केअर्स फंडातून येतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
HLL करणार खरेदी -
कंडोम तयार करणाऱ्या हिंदुस्तान लॅटेक्स लिमिटेड (एचआयएल) या सरकारी कंपनीला सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून करोनाच्या लशी विकत घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपनीने 1970च्या दशकात सरकारच्या कुटुंब नियोजन योजनेत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी ही कंपनी निरोध नावाने कंडोम तयार करत होती.
भारत ब्राझीललाही निर्यात करणार कोरोना लस -
भारतात तयार होणारी स्वदेशी लस आता ब्राझीललाही निर्यात केली जाणार आहे. 'कोव्हॅक्सीन' तयार करणारी औषध निर्माता कंपनी भारत बायोटेकने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे, की ब्राझीलला लस सप्लाय करण्यासाठी प्रीसिसा मेडिकामेंटो सोबत करार करण्यात आला आहे.
संभाव्य कोव्हॅक्सीनच्या निर्यातीसंदर्भातील चर्चेसाठी प्रीसिसा मेडिकामेंटोच्या एका चमूने गेल्या आठवड्यात भारत बायोटेकचा दौरा केला होता. या चमूने हैदराबाद येथील जीनोम व्हॅली येथील भारत बायोटेकच्या ऑफिसमध्ये 7 आणि 8 जानेवारीला डॉक्टर कृष्णा इला यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेत भारतातील ब्राझीलचे राजदूत आंद्रे अरणा कोरंगा डू लागो हेही व्हर्च्यूअली सहभागी जाले होते. यावेळी त्यांनी ब्राझील सरकारच्या वतीने कोव्हॅक्सीनच्या खरेदीसंदर्भात इच्छा व्यक्त केली होती.