Corona vaccine: मासिक पाळीच्या काळात कोरोना लस घेणं सुरक्षित; अफवांना बळी पडू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:29 AM2021-04-25T00:29:59+5:302021-04-25T00:30:09+5:30
अफवांना बळी पडू नका!
मेघना ढोके
नाशिक : मासिक पाळीच्या काळात कोरोना लस टोचून घेणं अत्यंत सुरक्षित आहे. त्यासंदर्भात सध्या समाजमाध्यमातून ‘व्हायरल’ होत असलेल्या गोष्टी तद्दन अशास्त्रीय आणि दिशाभूल करणाऱ्या, भीती पसरवणाऱ्या आहेत. त्यावर विश्वास ठेवून लस न घेणं महागात पडू शकतं.
समाजमाध्यमात एक पोस्ट फिरते आहे, ज्यात असं स्पष्ट म्हंटलेलं आहे की, मासिक पाळीच्या काळात महिलांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नये. मात्र ही पोस्ट धादांत चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे, असा स्पष्ट निर्वाळा स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ देतात. यासंदर्भात ‘लोकमत’ने स्त्री रोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर आणि शिल्पा चिटणीस जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यातले हे ठळक निष्कर्ष..
मासिक पाळी आणि प्रतिकारशक्ती यांचा काही संबंध असतो का?
अजिबात नाही. मासिक पाळीत प्रतिकार शक्ती कमी होते याचा काहीही संबंध नाही. मासिक पाळी सुरु असताना किंवा त्याआधी आणि नंतरही लस घेणं हे पूर्ण सुरक्षित आहे. त्याचा मासिक पाळीशी काहीही संबंध नाही.
गरोदर महिलांनी लस घ्यावी का?
डॉ. शिल्पा चिटणीस जोशी सांगतात, जगभरात अलीकडेच झालेले अभ्यास, स्त्री रोग तज्ज्ञांच्या संघटना असं सांगतात, की गरोदर महिलांनीही लस घ्यायला काहीच हरकत नाही.
डॉ. गौरी करंदीकर सांगतात, गरोदर महिलांनी लस घ्यावी का? तर यांसदर्भातील अलीकडचे अभ्यास सांगतात की, लस घ्यावी. मात्र गरोदर महिलांनी हा निर्णय स्वत:च्या स्वत: न घेता आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ते म्हणतील त्याप्रमाणे करावे.
हाय रिस्क प्रेगनन्सी, रक्तात गाठी होण्याचं प्रमाण, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बऱ्या झालेल्या महिला, मधूमेह, रक्तदाब असलेल्या महिला यांनीही डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार लस घ्यावी.
आपल्याकडे मासिक पाळीसंदर्भात ज्या अंधश्रध्दा आहे, त्यातूनच या पोस्ट व्हायरल होत आहेत की मासिक पाळीत लस घेऊ नये. मात्र लस घेणं, मासिक पाळी, प्रतिकार शक्ती यांच्या परस्पर संबंधांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. महिलांनी लस घ्यावी, मासिक पाळीच्या काळातही घ्यायला काहीच हरकत नाही.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी
मासिक पाळीच्या चक्रामध्ये शरीरात अनेक बदल होतात हे शंभर टक्के सत्य असलं तरी या चक्रानुसार प्रतिकारशक्ती हेलकावे खाते हे शंभर टक्के असत्य आहे. तेव्हा लस बेलाशक घ्यावी. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा घ्यावी. पाळीचा आणि लस टाळण्याचा काही संबंध नाही.
-डॉ. शंतनू अभ्यंकर, स्त्री आरोग्य तज्ज्ञ