Corona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 08:48 AM2021-05-17T08:48:36+5:302021-05-17T08:49:34+5:30
‘कोविन’ प्लॅटफॉर्ममध्ये बदल, यापूर्वी नोंदणी केलेल्यांना मिळणार डोस
नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील ‘कोविशिल्ड’ या लसीच्या दोन डोसमधील अंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढविले आहे. त्यानुसार लसीकरणाच्या नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कोविन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना ८४ दिवसांनीच दुसऱ्या डोससाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे, त्यांची नोंदणी वैध राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कोविडवरील समूह गटाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने ‘कोविशिल्ड’ लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढविले आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्यांना ८४ दिवसांपर्यंत ‘कोविन’वर किंवा थेट केंद्रावर नोंदणी करता येणार नाही. यापूर्वीच नोंदणी केलेल्यांना लसीकरण केंद्रावरून परत पाठविण्यात येत होते. त्यावर केंद्राने स्पष्टीकरण दिले आहे. अशा लाभार्थ्यांची नोंदणी वैध राहणार असून, त्यांना दुसरा डोस देण्यात येईल.
ऑक्सिजन पुरवठ्याप्रकरणी फसवणूक; दोन विदेशी नागरिकांना अटक
कोरोना उपचारांत उपयोगी ठरणारी पण सध्या तुटवडा असलेली औषधे व ऑक्सिजन पुरविण्याच्या नावाखाली सुमारे एक हजार लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. या आरोपींकडून १६५ सीम कार्ड, २२ मोबाईल फोन, ५ लॅपटॉप, ४ डेबिट कार्ड जप्त करण्यात आली आहेत. हे दोन्ही आरोपी आफ्रिका खंडातील देशांचे नागरिक आहेत. या आरोपींना इतक्या मोठ्या प्रमाणावर सीम कार्ड, मोबाईल कुणी मिळवून दिले, त्या साथीदारांचीही माहिती पोलीस मिळवत आहेत. या प्रकरणी आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले.