Corona Virus: संसर्ग टाळण्यासाठी घराची स्वच्छता कशी कराल? 'अशी' घ्या काळजी!  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:10 PM2020-03-13T23:10:30+5:302020-03-13T23:11:11+5:30

घराची साफसफाई करताना बहुतांश वेळा स्पंज, पोछा, जुने कपडे, मॉपचा वापर केला जातो. मात्र या वस्तूंची स्वच्छताही महत्त्वाची आहे.

Corona Virus: How do you clean your home to prevent infection? Take care of 'such'! pnm | Corona Virus: संसर्ग टाळण्यासाठी घराची स्वच्छता कशी कराल? 'अशी' घ्या काळजी!  

Corona Virus: संसर्ग टाळण्यासाठी घराची स्वच्छता कशी कराल? 'अशी' घ्या काळजी!  

googlenewsNext

सध्या जगभरात कोरोना (कोविड १९) व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून याबाबत उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनाही खबरदारीच्या विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना तेथील स्वच्छता आपल्या हातात नसली तरी आपले घर मात्र स्वच्छ, आरोग्यवर्धक बनवू शकतो. केवळ कोरोनापासून बचावासाठी नव्हे तर दैनंदिन आयुष्यही सुदृढ, आनंदी हवे असल्यास स्वच्छतेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी काही गोष्टी प्राधान्याने करणे आवश्यक आहे.

वारंवार हाताळणाऱ्या वस्तू
कोविड १९ व्हायरस हा प्रामुख्याने स्पर्शाने पसरत आहे. तुम्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास संसर्ग होतो, त्यात तुमची श्वसनक्रिया, ज्ञानेंद्रिये, प्रतिकारक्षमता कमकुवत अथवा आधीच बाधित असेल तर या आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वारंवार स्पर्श होणाºया जागा, उदा. दारे-खिडक्यांचे हॅण्डल, विजेची बटणे, शो-केस, टेबल आदी स्वच्छ असणे आवश्यक आहे. यासाठी कोणतेही विशेष सॅनिटायझर वारण्याची गरज नाही. घरातील डिटर्जंट पाण्यात मिसळूनही या वस्तू साफ करता येतात. घरात जितकी स्वच्छता ठेवाल, तितका संसर्ग टाळता येईल.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची काळजी
अत्यावश्यक आणि दिवसभर आपल्यासोबत असलेला मोबाइलही संसर्ग पसरविण्याचे साधन ठरू शकतो. त्यामुळे त्याची स्क्रीन कोमट पाण्याने कापड अथवा रुमाल ओलसर करून दररोज पुसणे आवश्यक आहे. याशिवाय संगणक, की-बोर्ड, माऊस, लॅण्डलाइन फोन, रिमोटही निर्जंतुक असणे आवश्यक आहे. विशेषत: घरात कुणी सर्दी-खोकला, तापाने आजारी असल्यास आणि अशा व्यक्तींकडून वरील वस्तू हाताळल्या जात असल्यास त्यांची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे.

कुटुंबातील आजारी सदस्यांची घ्या विशेष काळजी
घरात एखादी व्यक्ती आजारी असल्यास, तिची विशेष काळजी घ्यायला हवी. शक्य असल्यास त्यांना स्वतंत्र रूम, बाथरूमची व्यवस्था करावी. त्यांची प्रतिकारक्षमता वाढविण्यावर भर द्यावा. त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे. त्यांच्या राहण्याची जागा हवेशीर, पुरेसा सूर्यप्रकाश येईल अशी असावी. खोलीत किमान गरजेच्या वस्तू ठेवून अधिकाधिक मोकळी जागा ठेवावी. जेणेकरून त्यांची स्वच्छता राखणे सहज शक्य होईल.

बाथरूम ठेवा स्वच्छ
सर्वाधिक संसर्ग होऊ शकतो असे घरातील ठिकाण म्हणजे बाथरूम. त्यामुळे टॉयलेट, शॉवर, सिंक, वॉशबेसिन यांची वारंवार स्वच्छता व्हायला हवी. घरातील व्यक्तींनी आपापले टूथब्रेश वेगवेगळे ठेवावेत. हात पुसण्यासाठी वारण्यात येणारा नॅपकिनही नियमित धुतला जावा आणि आजारी व्यक्तीसाठी स्वतंत्र नॅपकिन ठेवावा.

किचनही ठेवा नेटके
खाद्यपदार्थ बनविताना हात स्वच्छ असणे आवश्यक आहे. इतरांना बाधा होऊ नये म्हणून आजारी व्यक्तींनी शक्यतो स्वयंपाकघरात प्रवेश टाळावा. आजारी व्यक्तींसाठी वेगळी प्लेट, ग्लास ठेवावा. या वस्तू गरम पाण्यात, साबणाने धुवाव्यात. त्यामुळे त्यांनाही बाधा होणार नाही आणि घरातील इतरही व्यक्तींचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.

स्वच्छतेसाठी वापरातील संसाधने
घराची साफसफाई करताना बहुतांश वेळा स्पंज, पोछा, जुने कपडे, मॉपचा वापर केला जातो. मात्र या वस्तूंची स्वच्छताही महत्त्वाची आहे. वारंवार वापरामुळे या वस्तूंमध्येही जंतू तयार होतात. अथवा त्यांचा कुबट वास येतो. त्यामुळे त्या वारंवार बदलत राहणे गरजेचे आहे. पुन्हा पुन्हा वस्तू वापरात असतील, तर गरम पाण्यात धुणे अथवा कडक उन्हात वाळवणे आवश्यक आहे. निर्जंतुकीकरणासाठी वापरात येणाºया वस्तू उदा. डेटॉल, फिनाईल यांच्या वापराबाबत देण्यात आलेल्या सूचनांचेही पालन होणे आवश्यक आहे. अन्यथा घर स्वच्छ होण्याऐवजी अधिकच संसर्गजन्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जीवनशैलीत ‘स्वच्छता’ प्रभावी : सुदृढ आरोग्य आणि आनंदी जीवनशैलीत स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. तुम्ही घर कितीही सजवा, महागड्या वस्तूंनी सुशोभित करा, मात्र जोपर्यंत ते स्वच्छ, साफ, नीटनेटके नसेल, तोपर्यंत घरातील व्यक्तींचे आरोग्यही उत्तम, आरोग्यवर्धक होऊ शकणार नाही. त्यामुळे घराच्या आकारापेक्षा त्यांची स्वच्छता जीवनशैलीत अधिक प्रभावी ठरते.

Web Title: Corona Virus: How do you clean your home to prevent infection? Take care of 'such'! pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.