Corona Virus : मुंबईत एका वृद्धाचा मृत्यू, जाणून घ्या कशी घ्याल घरातील वयोवृद्धांची काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:53 PM2020-03-17T12:53:48+5:302020-03-17T13:08:54+5:30
Corona Virus : हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेला 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते, या रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या अन्य समस्याही होत्या. याआधीही दिल्ली कोरोनाची लागण झालेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचं निधन झालं होतं.
चीनमध्ये जेवढ्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यातही वयोवृद्धांची संख्या अधिक असल्याचे दिसले. यावरून हे दिसून येतं की, वयोवृद्धांची या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वयोवृद्ध लोकांची रोगप्रतिकारकशक्ती इतरांच्या तुलनेत अधिक कमजोर असते. अशात त्यांना लागण होण्याचा धोका अधिक आहे. चला जाणून घेऊन घरातील वयोवृद्धांची काळजी कशी घ्यावी.
एका रूममध्ये ठेवा
जर घरात कुणी वृद्ध असतील तर त्यांना एका रूममध्ये थांबण्यास सांगा. त्यांना घरा बाहेर जाण्यास मनाई करा. जर त्यांना खोकला किंवा ताप असेल तर त्यांच्या संपर्कात जास्त येऊ नका. त्यांना भेटण्यासाठी कुणीही बाहेरचं येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच त्यांना सतत सर्जिकल मास्क वापरण्यासाठी द्यावा. मास्क एक दिवसांनी बदला. त्यांच्या वस्तूंना स्पर्श करू नका. त्यांना सॅनिटायजरने हात धुण्यास सांगा.
त्यांना चांगला आहार द्यावा
घरात वृद्धांना आणि तुम्ही सुद्धा रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा आहार घ्यावा. त्यासाठी फळांचा आणि वेगवेगळ्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. त्यांना आजारी पडतील असे कोणतेही थंड पदार्थ देऊ नका. सहज पचन होतील असेल पदार्थ द्या आणि जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगा.
डॉक्टरांना कधी दाखवाल?
कोरोना व्हायरसमध्ये आधी ताप येतो. त्यानंतर कोरडा खोकला आणि त्यानंतर एक आठवड्याने श्वास घेण्याची समस्या होऊ लागते. पण या लक्षणांचा अर्थ तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण झाली असा नाही. कोरोना व्हायरसच्या गंभीर केसेसमध्ये निमोनिया, श्वास घेण्यास अडचण, किडनी फेल होणे या समस्याही होतात. अशावेळी सामान्य लक्षणे दिसली तरी डॉक्टरांशी संपर्क साधा.
कुणाला असतो जास्त धोका?
वयोवृद्ध लोक ज्यांना आधीच काही आजार असतील जसे की, अस्थमा, मधुमेह आणि हृदयरोग. अशा लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते त्यांना याची लागण होण्याचा धोका अधिक असतो.