Corona Virus : चिंताजनक! कोरोनामुळे भारतीयांच्या फुफ्फुसांचं मोठं नुकसान; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 04:21 PM2024-02-19T16:21:51+5:302024-02-19T16:39:30+5:30
Corona Virus : कोरोनामुळे भारतीय लोकांची फुफ्फुसे खूपच कमकुवत झाली आहेत.
कोरोनामुळे भारतीय लोकांची फुफ्फुसे खूपच कमकुवत झाली आहेत. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरने केलेल्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, कोरोनामुळे फुफ्फुसे कमकुवत झाली आहेत. रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की भारतीय लोकांच्या फुफ्फुसांचं युरोप आणि चीनमधील लोकांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. काही लोक वर्षभरात यातून बरे होऊ शकतात परंतु इतरांना आयुष्यभर कमकुवत फुफ्फुसांसह जगावं लागेल.
रिसर्चमध्ये 207 लोकांच्या फुफ्फुसांचं परिक्षण करण्यात आलं. सौम्य किंवा मध्यम आणि गंभीर कोरोना असलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसाची तपासणी, सहा मिनिट वॉक टेस्ट, ब्लड टेस्ट आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. अतिसंवेदनशील फुफ्फुसांची तपासणी करण्यात आली. याला गॅस ट्रान्सफर (DLCO) म्हणतात. याद्वारे हवेतून ऑक्सिजन घेण्याची क्षमता मोजली जाते. तपासणीत 44 टक्के लोकांची फुफ्फुस खराब झाल्याचे आढळून आले.
डॉक्टरांच्या मते, हे अत्यंत चिंताजनक आहे. 35 टक्क्यांहून कमी रुग्णांच्या फुफ्फुसाचं नुकसान होतं. 35% लोकांना फुफ्फुसे संकुचित होण्याची समस्या होती. 8.3% लोकांमध्ये हवेच्या मार्गात अडथळा येण्याची समस्या आढळून आली, ज्यामुळे हवा फुफ्फुसात जाणं कठीण होतं. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
सीएमएस वेल्लोरच्या पल्मोनरी विभागाचे डॉ डीजे क्रिस्टोफर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक बाबतीत भारतीय रूग्णांची स्थिती चिनी आणि युरोपियन रूग्णांपेक्षा वाईट आहे. याव्यतिरिक्त, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त भारतीयांची संख्या चीनी आणि युरोपियन लोकांच्या तुलनेत जास्त आहे.
नैनवती रुग्णालयातील पल्मोनोलॉजीचे प्रमुख डॉक्टर सलील बेंद्रे यांच्या म्हणण्यानुसार, काही कोरोना रुग्णांना संसर्ग झाल्यानंतर सुमारे 8-10 दिवसांनी रुग्णालयात दाखल करणं, ऑक्सिजन सपोर्ट आणि स्टेरॉईड उपचार घेतल्यानंतर फायब्रोसिस झालं आहे. यापैकी सुमारे 95% रुग्णांमध्ये, फुफ्फुसाचे नुकसान हळूहळू बरं होतं. 4-5% रुग्णांना दीर्घकालीन श्वासोच्छवासाचा त्रास होतो.