Omicron Symptom : फक्त स्किनवरच दिसतं ओमिक्रॉनचं 'हे' विचित्र लक्षण, दिसताक्षणी व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:09 PM2021-12-30T22:09:25+5:302021-12-30T22:10:01+5:30
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिअंट सौम्य असला तरी, त्याचा संसर्ग दर खूप अधिक आहे आणि त्याला कुणीही अगदी सहजपणे बळी पडू शकतो. एवढेच नाही तर याची लक्षणेही डेल्टाच्या तुलनेत वेगळी आहेत.
कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या धडकी भरवणारी आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लादले जात आहेत. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिअंट सौम्य असला तरी, त्याचा संसर्ग दर खूप अधिक आहे आणि त्याला कुणीही अगदी सहजपणे बळी पडू शकतो. एवढेच नाही तर याची लक्षणेही डेल्टाच्या तुलनेत वेगळी आहेत. यापार्श्वभूमीवर, आरोग्य तज्ज्ञ याच्या लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा सल्ला देत आहेत, जेणेकरून त्याचा संसर्ग वेळीच वाढण्यापासून रोखता येईल.
Omicron चे असामान्य लक्षण -
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लोकांना आतापर्यंत Omicronची अनेक लक्षणे माहीत झाली आहेत, परंतु एक लक्षण असे आहे, की ज्याकडे लोकांचे लक्ष सहज सहजी जात नाही. तज्ज्ञांनी लोकांना त्यांच्या त्वचेवरही लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण या नव्या व्हेरिअंटमुळे स्किनवर रॅशेस येऊ शकतात. ZOE Kovid Symptom Study App नुसार, Omicron ची लागण झालेल्या बहुतेक लोकांनी त्वचेवर रॅशेसच्या तक्रारी केल्या आहेत. हे एक मुख्य लक्षण असून त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दोन प्रकारचे रॅशेस -
तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन संसर्गात त्वचेवर दोन वेगवेगळ्या प्रकारचे रॅशेस दिसून येतात. स्किन रॅशेसचा (Rashes) पहिला प्रकार, अचानक पणे दिसू लागतो आणि खाजही येते. हा प्रकार लहान-लहान पुरळांसारखा असू शकतात आणि याला तीव्र खाज सुटते. ही खास साधारणपणे हातांपासून अथवा तळ हातांपासून सुरू होते. दुसऱ्या प्रकारच्या रॅशेसमध्ये, ते घामोळ्यांसारखे दिसतात आणि संपूर्ण शरीरावर पसरतात. तसेच, ते साधारणपणे कोपरा, गुडघा, हात आणि पायांवर अधिक दिसून येतात.
डॉक्टरांचा इशारा -
लंडनमधील एका डॉक्टरने यापूर्वीच इशारा देत म्हटले होते, की ओमायक्रॉनची लागण झालेल्या मुलांमध्ये रॅशेसची समस्या दिसून आली आहे. मात्र, प्रौढांमध्ये हे लक्षण कमी प्रमाणात दिसून आले आहे. डॉ डेव्हिड लॉयड यांनी द सनशी बोलताना सांगितले होते, की त्यांना ओमायक्रॉनची लागन झालेल्या सुमारे 15 टक्के तरुण रुग्णांमध्येही रॅशेस दिसून आली आहेत. याशिवाय थकवा, डोकेदुखी आणि भूक न लागणे यासारख्या समस्याही त्यांच्यात आढळून आल्या. पुरळ उठण्यासोबतच ही लक्षणे ओळखणेही अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.