Corona Virus : 'या' Blood group च्या लोकांना कोरोना व्हायरसचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 09:21 AM2020-03-18T09:21:55+5:302020-03-18T09:28:18+5:30
Corona Virus : यावर वेगवेगळे रिसर्चही करण्यात आले आहेत. त्यात कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका असतो हे सांगण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले असताना लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्नही निर्माण होत आहेत. अनेक गैरसमज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले जात आहेत. सर्वसामान्यपणे रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असलेल्या व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जातं. तरी सुद्धा कोणत्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका आहे हे विचारलं जातं. यावर वेगवेगळे रिसर्चही करण्यात आले आहेत. त्यात कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका असतो हे सांगण्यात आलं आहे.
न्यूयॉर्क पोस्ट या वेबसाइटच्या वृत्तातील एका रिसर्चनुसार, तुमचा रक्तगट A असेल, तर तुम्हाला कोरोनाव्हायरसचा सर्वात जास्त धोका आहे आणि O असेल तर तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका कमी आहे. हा दावा आमचा नाही तर एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.
चीनमधील कोरोनाग्रस्त (coronavirus) ब्लड ग्रुपचा अभ्यास वैज्ञानिकांनी केला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये (South China Morning Post - SCMP) या रिसर्चबाबत माहिती देण्यात आली आहे. चीनच्या वुहान (Wuhan) आणि शेंझेन (Shenzhen) मधील 2 हजारपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांच्या ब्लड ग्रुपचा अभ्यास या संशोधकांनी केला.
वैज्ञानिकांना या रिसर्चमधून आढळून आले की, A ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचं प्रमाण अधिक आणि तीव्र आहे. तर O ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना इतर ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या तुलनेत कोरोना व्हायरसचा धोका कमी आहे.
यूएस नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फर्मेशनने केलेल्या अभ्यासानुसार, भारतात O ब्लड ग्रुप लोकं जास्त म्हणजे जवळपास 37.12 टक्के आहेत. त्यानंतर B ब्लड ग्रुपची 32.26 टक्के आणि A ब्लड ग्रुप ची 22.88 टक्के तर AB ब्लड ग्रुपची अगदी कमी म्हणजे 7.74 टक्के लोकं आहेत.
या रिसर्चवरून एकंदरच असं दिसतं की, वृद्ध व्यक्ती, पुरुष आणि आता A रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा धोका इतरांपेक्षा थोडा जास्त आहे, त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
असं असलं तरी तुमचा ब्लड ग्रुप O असला तरी तुम्ही कोरोना व्हायरसपासून पूर्णपणे सुरक्षित आहात असा याचा अर्थ होत नाही. त्यामुळे सरकार आणि डॉक्टरांनी ज्या काही सूचना दिल्यात त्या पाळा, आवश्यक ती काळजी घ्या.