Corona Vaccine: गुड न्यूज! मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी; एकाचवेळी दोन्ही हातांना मिळणार लस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:26 AM2021-07-26T07:26:44+5:302021-07-26T07:29:24+5:30
या चाचणीसाठी रुग्णालयाने २ हजार ७३७ सुदृढ लोकांची निवड केली. या सर्व लोकांना लस देण्यात आली आहे.
मुंबई : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसींची लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, जगभरात अजूनही कोरोनाला हरविण्यासाठी औषधोपचार आणि लसींचे संशोधन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून झायडसने बनविलेल्या झायकोव्ह-डी(Zycod-D vaccine) लसीची चाचणी देशभरात सुरू आहे. या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात जे. जे. समूहाच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयात झायकोव्ह-डी लसीची चाचणी सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
या चाचणीसाठी रुग्णालयाने २ हजार ७३७ सुदृढ लोकांची निवड केली. या सर्व लोकांना लस देण्यात आली आहे. लस दिल्याच्या पाच महिन्यांनंतर फक्त २२ लोकांना संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, चांगली गोष्ट अशी आहे की आजपर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसलेले नाहीत आणि ही लस घेतल्यानंतर संक्रमित झालेल्या व्यक्तींना फक्त सौम्य आणि मध्यम लक्षणे दिसली आहेत.
या संशोधनाचे नेतृत्व करणारे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले, झायकोव्ह-डी ही एक सुईशिवाय घ्यावी लागणारी लस आहे. ही इंट्रा-डर्मल लस आहे, ज्यास स्नायूंमध्ये इंजेक्शनची लावण्याची आवश्यकता नसते. या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा २८ व्या दिवशी आणि तिसरा ५२ व्या दिवशी घ्यावा लागतो. एकावेळी दोन्ही हातांना ०.२ मिली एवढ्या प्रमाणात लस दिली जाते.
कोणतेही दुष्परिणाम नाहीत
लस घेतल्यानंतर लोकांना कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे सांगितले. १५ फेब्रुवारी चाचणी सुरू केली असून या चाचणीत केवळ असेच लोक घेतले गेले ज्यांचा आरटीपीसीआर आणि अँटीबॉडीजचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या लस चाचणीचे नुकतेच पाच फॉलोअप पूर्ण केले आहेत.