coronavirus: भारत बायोटेकच्या 'Covaxin' या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू
By बाळकृष्ण परब | Published: November 17, 2020 07:50 AM2020-11-17T07:50:56+5:302020-11-17T07:53:36+5:30
Bharat Biotech Vaccine Update : भारत बायोटेक कंपनीने दोन ऑक्टोबर रोजी भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) यांच्याकडे लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी परवानगी मागितली होती.
नवी दिल्ली - भारत बायोटेकची कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन ( 'Covaxin') ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. या कंपनीने कोविड-१९ वरील लसीसाठी आयसीएमआर सोबत भागिदारी केली आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सोमवारपासून सुरू झाली आहे.
भारत बायोटेक ही जगातील एकमात्र लसनिर्माती कंपनी आहे जिच्याकडे जैव सुरक्षा स्तर-३ (बीएसएल३) उत्पादनाची सुविधा आहे. गेल्या महिन्यात कंपनीने सांगितले होते की, तिने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षणाचे अंतरिम विश्लेषण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आता कंपनी २६ हजार स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू करणार आहे. याबाबत कंपनीने वेबसाईटवर एक लिंक शेअर केली आहे.
Phase 3 clinical trial of COVAXIN™️ takes off as the largest efficacy trial ever conducted in India, with about 26,000 participants. pic.twitter.com/qyCkoOkUl9
— BharatBiotech (@BharatBiotech) November 16, 2020
भारत बायोटेक कंपनीने दोन ऑक्टोबर रोजी भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) यांच्याकडे लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी परवानगी मागितली होती. दरम्यान, ही कंपनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एक अजून लस विकसित करत आहे. ही लस नाकाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ड्रॉपच्या रूपात असेल. ही लस पुढील वर्षापर्यंत तयार होईल.
दरम्यान, अमेरिकन औषधनिर्माता कंपनी मॉडर्नाने त्यांनी विकसित केलेली कोरोनावरील लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. लेट स्टेज क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीच्या डेटाच्या आधारावर कंपनीने हा दावा केला आहे. एका आठवड्याच्या आत लसीबाबत सकारात्मक माहिती देणारी मॉडर्ना दुसरी अमेरिकन कंपनी आहे.