कोरोनाला रोखण्यासाठी सेल थेरेपी ठरत आहे प्रभावी , 'या' दोन देशात आला पॉजिटिव्ह रिजल्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:55 AM2020-04-22T10:55:14+5:302020-04-22T11:11:14+5:30
कोरोनाच्या उपचारांसाठी सेल थेरेपीचा वापर अनेक देशांमध्ये केला जात आहे.
चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचं संक्रमण अमेरिका, स्पेन, इटलीसह भारतातसुद्धा मोठया प्रमाणावर पसरत गेलं आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून लोकांना वाचवण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वेगवेगळे प्रयोग करून कोरोनावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी सेल थेरेपीचा वापर अनेक देशांमध्ये केला जात आहे. अमेरिका आणि इस्त्राईलमध्ये या थेरेपीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
इस्त्राईलमध्ये सहा रुग्णांवर सेल थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. अशी माहिती एका इंग्रजी माध्यमातून देण्यात आली आहे. इस्त्राईलच्या प्लूरिस्तेम या कंपनीने कोरोना व्हायरसचं गंभीर संक्रमण झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी एक नवीन मार्ग शोधून काढला आहे. यरूशलम पोस्ट ने दिलेल्या माहितीनुसार तीन रुग्णांलयांमध्ये सहा रुग्णांवर प्लेसेंटा थेरेपी करण्यात आली होती. त्यातील सहापैकी चार रुग्ण किडनी आणि हृदय विकाराच्या आजाराने प्रभावित होते.
अमेरिकेतसुद्धा सकारात्मक परिणाम
अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये असलेल्या एका मेडीकल सेंटरमधील रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. त्या रुग्णाची श्वास घेण्याची क्षमता कमी झाली होती. स्टेम सेल थेरेपीचा वापर यावेळी कोरोना रुग्णावर पहिल्यांदा करण्यात आला होता.
कशाप्रकारे काम करते ही थेरेपी
उपचारांसाठी वापर केल्या जात असलेल्या सेल्सना पीएलएक्स असं नाव देण्यात आलं आहे. हे एलोजेनीक म्हणजेच अनुवाशिंकतेने भिन्न असलेले सेल्स आहेत. यात शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय करण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश असतो. हे सेल्स रोगप्रतिकारकशक्तीवर नैसर्गिकरित्या परिणाम करत असलेल्या टी सेल्स आणि एम-2 मेक्रोफेज्सना सक्रिय करतात. निमोनीया आणि फुप्फुसांमध्ये आलेली सूज कमी करण्यासाठी परिणामकारक ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या श्वसन प्रणालीत सुधारणा होऊन जीव वाचवला जाऊ शकतो. असं तज्ञांचं मत आहे.
(Israeli firm hopeful as it starts treating COVID-19 patients with placenta cells)