CoronaVirus News: कोरोना संसर्गामुळे रक्तातील साखर खूप वाढण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:55 AM2020-06-15T03:55:54+5:302020-06-15T03:56:11+5:30
स्वादुपिंडाच्या कार्यशैलीवर परिणाम; मधुमेहींनी काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे स्वादुपिंडावर परिणाम होण्याची शक्यता असून, त्यामुळे त्या माणसाला मधुमेहाचा विकार जडण्याचा धोका असतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढते, असे मधुमेहतज्ज्ञांना वाटत आहे.
रक्तात साखरेचे ४०० ते ५०० मिलिग्रॅम/डेसिलिटर इतके प्रमाण असलेले व वाढत्या साखरेवर नियंत्रण मिळविता येत नाही, अशी तक्रार असलेल्या रुग्णांवर उपचार करताना मधुमेहतज्ज्ञांनी काही निरीक्षणे नोंदविली आहेत. रक्तात शर्कराचे प्रमाण वाढलेल्या रुग्णांच्या स्वादुपिंडात एन्झाइमचे प्रमाणही वाढलेले असते. स्वादुपिंड इन्सुलिन तयार करते. त्याच्याकरवी रक्तातील शर्करेचे नियंत्रण केले जाते.
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्याचा स्वादुपिंडाच्या कार्यावरही परिणाम होतो, अशी शक्यता मधुमेहतज्ज्ञांना वाटते. त्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जगभरातील मधुमेहतज्ज्ञांपैकी १७ जणांनी एक गट स्थापन केला आहे. न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसिन या नियतकालिकात शनिवारी या तज्ज्ञांच्या गटाचे एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. या पत्रात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग व रक्त्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण यांचा संबंध शोधण्यासाठी कोविडायब या नावाचा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कोरोनाचा विषाणू माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यास एसीई-२ हे प्रथिन साहाय्यभूत ठरते. हे प्रथिन फुप्फुसच नव्हे तर स्वादुपिंड, लहान आतडे, मूत्रपिंडातही अस्तित्वात असते. पेशींमध्ये कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर शरीरातील ग्लुकोजच्या प्रमाणावर त्याच्या विपरित परिणाम होतो असे मानण्यात आले.
पुराव्याशिवाय ठोस विधाने नाहीत
एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तात्पुरते वाढले असल्यास त्याला मधुमेह म्हणता येत नाही. अशा रुग्णांच्या प्रकृतीवर सतत सहा महिने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने या विकाराबाबत ठोस विधाने करता येतील, असे मत काही मधुमेहतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.