Coronavirus: जागतिक पातळीवर कोरोना रुग्ण घटू लागले; आतापर्यंत १६ कोटींपैकी १४ कोटी बरे झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:01 AM2021-05-17T07:01:51+5:302021-05-17T07:02:37+5:30
जगभरात आतापर्यंत १६ कोटी बाधितांपैकी १४ कोटी रुग्ण बरे झाले असून ३३ लाख ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतातही रविवारी सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आढळून आली
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून जगाला विळखा घालून बसलेल्या कोरोना विषाणूची मगरमिठी आता सैलावू लागल्याचे संकेत आहेत. जागतिक स्तरावर कोरोनाबाधितांच्या संख्येत उतार जाणवू लागला असून ९ मे रोजी कोरोनाने बाधित होणाऱ्यांची दैनंदिन संख्या जगात ६ लाख ६५ हजार होती ती १५ मे रोजी ६ लाख ३४ हजारांपर्यंत खाली आली.
जगभरात आतापर्यंत १६ कोटी बाधितांपैकी १४ कोटी रुग्ण बरे झाले असून ३३ लाख ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतातही रविवारी सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आढळून आली. अमेरिकेत सध्या ३ कोटी ३६ लाख इतके कोरोनाचे रुग्ण असून, त्यातील २ कोटी ७० लाख रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. त्या देशात आतापर्यंत गेलेल्या कोरोना बळींचा आकडा सहा लाखांच्या नजीक पोहोचला आहे.
भारतातही लक्षणीय घट
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ११ हजार नवे रुग्ण आढळून आले. ६ ते ९ मे या कालावधीत देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या ४ लाखांवर गेली होती. ७ मे रोजी ती ४ लाख १४ हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, नंतर ही संख्या कमी होऊ लागली.
४.२५ कोटी लोकांना दोन्ही डोस
देशात गेल्या १२० दिवसांत १८.२२ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली. त्यात १८ वर्षे वयावरील ४.२५ कोटी लोकांना कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये ६६.४१ लाख आरोग्य सेवक, ८१.८६ लाख कोरोना योद्धे व ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ९९.६६ लाख लोक व ६० वर्षांपुढील १.७८ कोटी लोकांचा समावेश आहे.