Coronavirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून कसा कराल लहान मुलांचा बचाव? तज्ज्ञांनी सांगितला 'डाएट प्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 08:04 PM2021-05-10T20:04:06+5:302021-05-10T20:31:43+5:30
Coronavirus : या टिप्सचा वापर करून तुम्ही आपल्या कुटुंबातील लहान मुलांना संसर्गापासून लांब ठेवू शकता.
भारतात कोरोनाची तिसरी लाट थैमान घालू शकते असा अंदाज लावला जात आहे. त्यातही या लाटेमुळे लहान मुलांचा सगळ्यात जास्त फटका बसू शकतो. तज्ज्ञांनी कोरोनापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्सचा वापर करून तुम्ही आपल्या कुटुंबातील लहान मुलांना संसर्गापासून लांब ठेवू शकता.
Nutri4Verve च्या फाऊंडर आणि प्रमुख न्यूट्रिशिनिस्ट शिवानी सिकरी यांनी सांगितले की, लहान मुलांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी १० गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. मुलांची तब्येत चांगली राहण्यात आहाराची महत्वाची भूमिका असते. जंक फूड, फास्ट फूडचं सेवन करणं लहान मुलांसाठी घातक ठरत आहे.
आहारातील पोषणाच्या कमतरतेमुळे व्हायरस आणि बॅक्टेरियांना अतिसंवेदनशील बनवलं आहे, म्हणून आई वडीलांनी मुलांना मुलांना सगळी पोषक तत्व कशी मिळतील याचा विचार करायला हवा. अंडी, मासे, मल्टीग्रेन पीठ, नट्स, बदाम, आक्रोड, बिया, आळशी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.
रोगप्रतिराकशक्ती वाढवणारी फळं, व्हिटामीन सी युक्त फळं, डायटरी फायबर्सचा आहारात समावेश असायला हवा. मोसंबी, संत्री, स्ट्रॉबेरी, शिमला मिरची, ब्रोकोली, कडधान्य लहान मुलांना खायला द्यावीत. मुलांना जंक फूडपासून लांब ठेवावं. कारण जास्त जंक फूड खाणं रोगप्रतिराकशक्ती कमी होण्याचं कारण ठरू शकतं.
मुलांच्या आहारात हळदीचा समावेश असावा, हळदीत करक्यूमिन नावाचा पदार्थ असतो. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते. ताज्या भाज्या, फळं, आहारात असायलाच हवीत. ताण तणाव फक्त मोठ्या व्यक्तींनाच नाही तर लहान मुलांनाही प्रभावित करतो. म्हणून मुलांवर कोणत्याही गोष्टींचा ताण येणार नाही. याची काळजी घ्या.
८ ते १० तासांची झोप घेणं महत्वाचं आहे. फ्लू, कांजिण्या, पोलिया यांसारख्या इतर आजारांचे लसीकरण लहान मुलांचे पूर्ण झालेले असावे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही होम आयसोलेशनमध्ये राहायला हवं. मुलांमध्येही तीव्र लक्षणं जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या