Coronavirus: थंडीच्या दिवसांत कोरोना पुन्हा फैलावू शकतो; कोरोनाचा लढा लांबण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 12:11 AM2020-05-06T00:11:31+5:302020-05-06T00:11:43+5:30
ह्या दुखण्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच जागतिक आरोग्य संघटना व अमेरिकन रोगनियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने कोरोनाचा पुढचा बॉम्ब फोडला आहे.
अमेरिका, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड
सध्या जग कोरोनाच्या विषाणूशी जोरदार लढा देत आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्यात अनेक देश यशस्वी होत असताना अमेरिका, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स आदी राष्ट्रांना कोरोनाने चांगलेच जखडले आहे. रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात असताना मृत्यूची संख्याही आता अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक बाधित देश आपापल्या परीने कोरोनाशी लढा देत आहे. अलीकडील काळात अनेक ठिकाणचे लाकडाऊन उठविले असून, व्यवहार काही प्रमाणात सुरळीत होण्याच्या मार्गावर आहेत; पण लोक तब्बल दीड-दोन महिन्यांनी घराबाहेर पडल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाा आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आणखी एक मोठी समस्या उभी राहिली आहे. असे असले तरी कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात येण्यासाठी महत्त्वाचे आहे ते सोशल डिस्टन्सिंग. तेच जर पाळले नाही, तर पुन्हा कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढण्याची भीती आहे. उद्योग, व्यवसाय सुरू करून आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित करणे, हा उद्देशच लॉकडाऊन उठविण्यामागेही आहे. कोरोनाशी लढता-लढता सर्व राष्ट्रांसमोर हाही प्रश्न सोडविण्याचे आव्हान आहे.
ह्या दुखण्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच जागतिक आरोग्य संघटना व अमेरिकन रोगनियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने कोरोनाचा पुढचा बॉम्ब फोडला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पुढील थंडीच्या दिवसांत कोरोना विषाणू पुन्हा आपले तोंड वर काढण्याची दाट शक्यता असून, जगभरातील अनेक देशांना त्याच्याशी पुढील वर्षभर तरी लढा द्यावा लागेल. त्यामुळे अमेरिकेसह चीन, ब्रिटन, फ्रान्ससह अनेक देशांनी कोरोनाविरोधी लढण्यासाठी सज्ज राहण्याची तयारी सुरू केली आहे.
तज्ज्ञांनी आणखी एक इशारा दिला आहे की, जर लॉकडाऊन उठल्यानंतर नागरिकांनी जर विविध कार्यक्रम, पार्टी, बाजार आदी ठिकाणी गर्दी केली, तर यापेक्षाही भयावर परिस्थिती हा कोरोना आणेल. स्पेन सरकारनं अशी भीती व्यक्त केली आहे की, देशातील नागरिकांसाठी नियम शिथील केले, तर पुन्हा कोरोनाचा धोका वाढू शकतो. असे असले तरी स्पेन सरकारमधील विरोधी पक्षांनी लॉकडाऊन वाढविण्याला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे द्विधावस्थेत सापडलेले सरकार तणावात आहे.