चिंताजनक! कोरोना विषाणू संसर्गामुळे शुक्राणू निर्मितीत घट, वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 07:34 AM2021-08-02T07:34:31+5:302021-08-02T07:41:03+5:30
Coronavirus & Sexual Health: कोविडच्या संसर्गामुळे शुक्राणू निर्मितीच्या क्षमतेत घट झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नुकतेच मांडले आहे. शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया पूर्ववत होण्यासाठी २ ते ३ महिने लागत असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.
- स्नेहा मोरे
मुंबई : कोविडच्या संसर्गामुळे शुक्राणू निर्मितीच्या क्षमतेत घट झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नुकतेच मांडले आहे. (Coronavirus & Sexual Health) शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया पूर्ववत होण्यासाठी २ ते ३ महिने लागत असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले आहे. ( Coronavirus infection reduces sperm production, medical experts observe)
यापूर्वी, जागतिक पातळीवर केलेल्या अभ्यासाद्वारे एचआयव्ही, हेपेटायटिस सी, इबोला यांसारखे आजार शुक्राणू निर्मितीवर परिणाम करत असल्याचे आढळले आहे. यामुळे हार्मोन्स बदल, शुक्राणूची पातळी कमी-जास्त होणे यांसारखे बदल दिसून आले आहेत. याचप्रमाणे आता कोविडमुक्तीनंतर अशा स्वरूपाचे बदल होत असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे ताप येतो, या तापामुळे पोस्ट कोरोना स्थितीत हा संसर्ग होतो. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये शुक्राणू कमी होतात, परंतु ही स्थिती तात्पुरत्या काळासाठी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परिणामी, आयव्हीएफ प्रक्रियेचे उपचार घेणाऱ्या दाम्पत्यांना या शुक्राणूच्या कमतरतेमुळे उपचार पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो, अशी माहिती क्लिनिकल डायरेक्टर कन्संलटंट रिप्रॉडक्टटिव्ह मेडिसीनचे डॉ. रिचा जगताप यांनी दिली.
इंदिरा आयव्हीएफचे सहसंस्थापक डॉ. क्षितीज मुरदिया यांनी सांगितले, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कोविडच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. बाधित होणाऱ्या पुरुष रुग्णांमध्ये शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेवर तात्पुरत्या कालावधीकरिता परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मात्र हा दुष्परिणाम कायमस्वरूपी नसून ठराविक काळासाठी आहे. कोविड रुग्णांमध्ये ताप अधिक येत असल्याचे दिसून येते, त्यामुळे पुरुषांच्या रिप्रोडक्शन ट्रॅक्टवर परिणाम होतो.
काही काळासाठी कमी प्रमाण
नॅशनल इन्स्टिट्यूट फोर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या अभ्यास अहवालानुसार, पुरुषांमध्ये कोविडमुक्तीनंतर शुक्राणू कमी निर्मित होतात. मात्र योग्य वैद्यकीय सल्ला व औषधोपचारानंतर काही काळाने ही प्रक्रिया पूर्ववत होते असे दिसून आले आहे.
ताण, नैराश्याने बदल
- सेक्साॅलाॅजिस्टच्या निरीक्षणानुसार, कोरोना उपचार प्रक्रियेत ताण आणि नैराश्यामुळे रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.
- त्यामुळै लैंगिक क्षमतेवरही काही काळ दुष्परिणाम होतो परंतु, वैद्यकीय सल्ल्यानंतर रुग्णाला बरे वाटते.