Coronavirus: नाकावाटे देण्याची कोरोनाची लस शक्य; अमेरिकी वैज्ञानिकांचे प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:54 AM2020-08-26T02:54:43+5:302020-08-26T06:51:38+5:30
सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ मेडिसिन’च्या वैज्ञानिकांनी एका निवेदनात म्हटले की, या लशीचे उंदरांवर इंजेक्शनने नसेत टोचून व नाकात थेंब टाकून असे दोन्ही प्रकारे प्रयोग केले.
वॉशिंग्टन : सध्या जगभर हाहाकार माजविलेल्या कोराना महामारीविरुद्धची इंजेक्शनने टोचण्याऐवची नाकात थेंब टाकून किंवा फवारा मारून देता येईल, अशी प्रतिबंधक लस तयार केल्याचा व उंदरांवरील प्रयोगांचे उत्साहवर्धक निष्कर्ष निघाल्याचा दावा अमेरिकेतील वैज्ञानिकांनी केला.
सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ मेडिसिन’च्या वैज्ञानिकांनी एका निवेदनात म्हटले की, या लशीचे उंदरांवर इंजेक्शनने नसेत टोचून व नाकात थेंब टाकून असे दोन्ही प्रकारे प्रयोग केले.
इंजेक्शनने लस दिल्यास फक्त लक्षणांची तीव्रता कमी होते परंतु नाकावाटे लस दिल्यास केवळ श्वसनसंस्थेतच नव्हे, तर संपूर्ण शरीरात कोनोना विषाणूंचा प्रसार होण्यास प्रतिबंध होतो, असे दिसून आले. येत्या काही महिन्यांत मानवी रुग्णांवर प्रयोग सुरु करू.
मात्र ते केव्हा पूर्ण होतील, हे आत्ताच सांगता येणार नाही; पण प्रयोग यशस्वी झाले व सर्व नियामक संस्थांकडून संमती मिळाली तर सध्या तोंडात थेब घालून जशी पोलिओची लस दिली जाते तशीच नाकात थेंब टाकून किंवा फवारा मारून कोरानाची लसही देणे शक्य व्हावे, अशी आशा आहे.