Corona Vaccine : मुलांना पहिला, तर वृद्धांना बूस्टर डोस; जाणून घ्या, कुणाला मिळणार कोणती लस?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:26 AM2021-12-27T00:26:16+5:302021-12-27T00:26:27+5:30
COVID-19 लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर असण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोना लस दिली जाणार आहे. यानंतर 10 जानेवारीपासून इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. दरम्यान, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलांसाठी देशात केवळ भारत बायोटेक आणि ICMR ने उत्पादित केलेली कोव्हॅक्सीनच उपलब्ध असेल. याशिवाय, आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर्स आणि को-मॉरबिडिटीच्या वृद्धांना बूस्टर डोस म्हणून त्यांनी आधीचे दोन डोस ज्या लसीचे घेतले आहेत तीच लस टोचली जाईल.
अधिकृत सूत्रांचा हवाला देत लाइव्ह हिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, “भारत बायोटेकने उत्पादित केलेली ही लसच देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. या श्रेणीत देशात सुमारे 7 ते 8 कोटी लोक आहेत. Zydus Cadila ची लस ZyCoV-D देशाच्या लसीकरण मोहिमेत अद्याप समाविष्ट करण्यात आलेली नाही. खरे तर या लसीला 20 ऑगस्टलाच आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकेल, अशी ही देशातील पहिलीच लस आहे. तसेच ही स्वदेशी लग जगातील पहिली DNA-आधारित सुई-मुक्त COVID-19 लस आहे.
COVID-19 लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर असण्याची शक्यता आहे. ही नवीन श्रेणी अॅड करण्यासाठी कोविन पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना करोनाची लस दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.